मुंबई; पुढारी वृत्तसेवा : आम्ही कररूपाने दिलेल्या पैशातून आजकाल काही लोक नको ती अंधश्रद्धा करत आहेत. ती त्यांनी स्वखर्चावर करायला हरकत नाही, असे सांगत खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अंधश्रद्धेवरून अप्रत्यक्षरीत्या टोला लगावला.
मुख्यमंत्री शिंदे यांच्या आसामवारीला अंधश्रद्धा म्हटले जात आहे. त्यावरून त्यांनी हा टोला लगावला. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान आणि शिक्षण विकास मंच आयोजित राज्यस्तरीय तेराव्या शिक्षण परिषदेमध्ये मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणी संदर्भात ही परिषद आयोजित करण्यात आली होती, या परिषदेला राज्यभरातील शिक्षक संस्था चालक आणि शिक्षण क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
खासदार सुळे म्हणाल्या की, आजकाल काही लोकांचा इतिहास पाहून डोके खाली करून बसून राहायची वेळ आली आहे. या शिक्षण परिषदेतफ डॉ. कुमुद बन्सल उत्कृष्ट शैक्षणिक ग्रंथ पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. हा पुरस्कार गोरेगावच्या दि शिक्षण मंडळातर्फे लिहिण्यात आलेला 'शिकणारी शाळा 'अभि' रंग आणि 'बाल'रंग, तसेच लेखिका उषा धर्माधिकारी लिखित कर्णबधिरांच्या विश्वात, लेखिका रजनी परांजपे लिखित सर्वांसाठी शिक्षण, लेखक डॉ. गणपती कमळकर लिखित ऑनलाईन शिक्षण पद्धती आणि लेखिका डॉ. मेधा उज्जैनकर लिखित 'मराठी विज्ञान परिभाषा' या पुस्तकांना प्रदान करण्यात आला.