नाशिक (ताहाराबाद) : पुढारी वृत्तसेवा
प्रादेशिक पर्यटन विकास योजनेंतर्गत पहिल्या टप्प्यात ऐतिहासिक मुल्हेर किल्ला व श्रीक्षेत्र भीमाशंकर तीर्थक्षेत्र विकासासाठी सात कोटी 79 लाखांचा निधी मंजूर झाल्याची माहिती बागलाणचे आमदार दिलीप बोरसे यांनी दिली.
बागलाण तालुक्यातील साल्हेर किल्ल्याच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराज सुरतेवर छापा टाकून परतीच्या मार्गावर असताना शत्रूंशी पहिली मैदानी लढाई झाली होती. या लढाईत किल्लेदार सूर्याजी काकडे शहीद झाले होते. या शिवशाहीचा साक्षीदार असलेल्या या किल्ल्याच्या पायथ्याशी लढाई झालेल्या ठिकाणी शिवसृष्टी साकारण्यात येणार असून, सुमारे सव्वाशे कोटींचा डीपीआर प्रादेशिक पर्यटन विकास विभागाकडे सादर केला असल्याचे आमदार बोरसे यांनी नमूद केले. या प्रस्तावासोबत साल्हेर किल्ला, श्रीपुरवडे येथील श्रीक्षेत्र भीमाशंकर, दोधेश्वर येथील महादेव मंदिर, ठेंगोडा येथील नवशा गणपती, सटाणा शहरातील देवमामलेदार श्री यशवंतराव महाराज यात्रास्थळ विकसित करणे, हरणबारी येथे बोटिंग क्लब, मांगीतुंगी तीर्थक्षेत्र विकसित करण्याचाही प्रस्ताव सादर झाला आहे. पहिल्या टप्प्यात साल्हेर किल्ल्याच्या विकासासाठी तीन कोटी 93 लाख व श्रीक्षेत्र भीमाशंकर तीर्थक्षेत्र विकासासाठी तीन कोटी 86 लाखांच्या निधीला प्रादेशिक पर्यटन विकास योजनेंतर्गत पर्यटन विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मंजुरी दिली असून, अनुक्रमे एक कोटी 96 लाख 50 हजार व एक कोटी 93 लाखांचा निधीदेखील वितरित करण्यात आल्याचे आमदार बोरसे यांनी सांगितले.
ही होणार कामे…
श्रीक्षेत्र भीमाशंकर तीर्थक्षेत्र परिसरात रस्ता, जलकुंड, पाण्याचा निचरा होण्यासाठी गटार, चेंजिंग रूम, सोलर युनिट, फर्निचर, पथदीप, पर्यटकांना शुद्ध पाणी पिण्यासाठी वॉटर प्युरिफायर प्लांट, रेलिंग बसविण्यात येणार आहे. तसेच ऐतिहासिक मुल्हेर किल्ला परिसरात दिशादर्शक फलक, पर्यटकांसाठी निवासव्यवस्था, बैठकव्यवस्था, जोडरस्ता, पथदीप, वॉटर प्युरिफायर प्लांट, छोटेखानी उद्यान, खेळणी व्यवस्था आदी कामे केली जाणार आहेत.