एनएसई घोटाळा प्रकरण : चित्रा रामकृष्ण यांना दिल्ली उच्च न्यायालयाकडून जामीन | पुढारी

एनएसई घोटाळा प्रकरण : चित्रा रामकृष्ण यांना दिल्ली उच्च न्यायालयाकडून जामीन

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रीय शेअर बाजार अर्थात एनएसई घोटाळा प्रकरणात गंभीर आरोप झालेल्या या संस्थेच्या तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी चित्रा रामकृष्ण यांना दिल्ली उच्च न्यायालयाने हवाला प्रकरणात जामीन दिला आहे. एनएसई को-लोकेशन, हवाला तसेच एनएसईच्या कर्मचाऱ्यांचे फोन टॅपिंग केल्याच्या प्रकरणात तपास संस्थांनी रामकृष्ण यांच्यावर गुन्हे दाखल केलेले आहेत.

गतवर्षीच्या जुलै महिन्यात सीबीआयने चित्रा रामकृष्ण यांना अटक केली होती. सीबीआयने दाखल केलेल्या प्रकरणात गतवर्षीच्या सप्टेंबर महिन्यात रामकृष्ण यांना न्यायालयाने जामीन दिला होता. चित्रा रामकृष्ण या एनएसई घोटाळ्याच्या मुख्य सूत्रधार असल्याने त्यांना जामीन दिला जाऊ नये, अशी विनंती ईडीने नुकतीच न्यायालयाकडे केली होती. मात्र दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जसमीत सिंग यांनी रामकृष्ण यांचा जामीनअर्ज मंजूर केला.

वर्ष 2009 ते 2017 या कालावधीत चित्रा रामकृष्ण, एनएसईचे तत्कालीन मुख्य अधिकारी रवी नरेन व दुसरे अधिकारी महेश हल्दीपूर यांनी आयसेक सर्व्हिसेस कंपनीची मदत घेत एनएसईच्या कर्मचाऱ्यांचे फोन टॅप केल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे आयसेक सर्व्हिसेस ही मुंबईचे तत्कालीन पोलिस आयुक्त संजय पांडे यांनी स्थापन केलेली कंपनी आहे.

Back to top button