

जळगाव : आधीच महागाईच्या वणव्यात होरपळणाऱ्या जळगावकरांना आज सकाळपासूनच इंधन दरवाढीचा मोठा 'झटका' बसला आहे. जिल्ह्यात पेट्रोलच्या किमतीत ३ रुपये १३ पैसे, तर डिझेलच्या किमतीत ३ रुपये ११ पैशांची भरमसाठ वाढ करण्यात आली आहे. या दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले असून, वाहतूकदारांसह शेतकऱ्यांच्या मशागतीची गणितेही आता पूर्णपणे विस्कटणार आहेत.
जळगाव शहरात आज सकाळपासूनच नवीन दर लागू करण्यात आले आहेत. जुन्या दरांच्या तुलनेत झालेली ही वाढ वाहनधारकांचे कंबरडे मोडणारी आहे.
पेट्रोल
१०५.५० रुपये जुना दर (प्रति लीटर)
१०८.६४ रुपये नवीन दर (प्रति लीटर)
३.१३ रुपये वाढ
डिझेल
९२.०३ रुपये जुना दर (प्रति लीटर)
९५.१४ रुपये. नवीन दर (प्रति लीटर)
३.११ रुपये वाढ
वाहतूकदारांचा 'टप्पा' महागला!
डिझेलच्या किमती वाढल्याने मालवाहतूक आणि प्रवासी वाहतूक करणाऱ्यांना मोठा फटका बसला आहे. यावर प्रतिक्रिया देताना टेम्पो ट्रॅव्हल्स मालक मयूर चौधरी म्हणाले की, "डिझेल महागल्यामुळे गाडीच्या रनिंग कॉस्टमध्ये (किलोमीटर मागे) दोन रुपयांची थेट वाढ झाली आहे. महाराष्ट्राबाहेरील डिझेल आणि येथील दरांमध्ये आता मोठी तफावत आहे. आम्हाला आता किलोमीटर मागे दोन रुपये वाढवल्याशिवाय पर्याय उरलेला नाही."
बळीराजाची 'नांगरटी' आता महागणार
ऐन मशागतीचे दिवस असताना डिझेल दरवाढीने शेतकऱ्यांचेही कंबरडे मोडले आहे. शेतीची कामे करणाऱ्या ट्रॅक्टरच्या दरात १६ तारखेपासून मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. यावर शेतकरी विक्रम पाटील (शिदी) यांनी सांगितले की, "सध्या नांगरटी १३०० ते १८०० रुपये आणि रोटर १५०० रुपये दराने सुरू आहे. मात्र, इंधन दरवाढीमुळे येत्या दोन दिवसांत हे दर वाढणार आहेत. ज्यांचे व्यवहार आधी ठरले आहेत त्यांचे काम जुन्या दराने सुरू असले तरी, नवीन कामांसाठी जादा पैसे मोजावे लागणार आहेत."
सामान्य जनतेत संतापाची लाट
सकाळी पेट्रोल पंपावर आलेल्या वाहनधारकांनी या दरवाढीवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. "पगार वाढत नाही, पण पेट्रोलचे भाव रोज रॉकेटसारखे वाढत आहेत. आता दुचाकी चालवणेही परवडण्यापलीकडे गेले आहे," अशी संतप्त भावना एका वाहनचालकाने व्यक्त केली. एकूणच, या दरवाढीमुळे जळगावच्या बाजारपेठेवर आणि जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीवरही परिणाम होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.