मंत्री गुलाबराव पाटील www.pudhari.news
मंत्री गुलाबराव पाटील www.pudhari.news

धुळे : भूमिगत गटारींच्या कामात गैरप्रकार; मंत्री गुलाबराव पाटलांचे चौकशीचे आदेश

Published on

धुळे ; पुढारी वृत्तसेवा

धुळे शहरातील देवपूर भागातील भूमिगत गटारीच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार झाल्याच्या तक्रारीची दखल घेत राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी घेतली. त्‍यांनी या कामांची ताबडतोब चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशामुळे महानगरपालिकेच्या गोटात मोठी खळबळ उडाली. या चौकशीत मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

भुयारी गटारीचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याच्या तक्रारी

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख डॉक्टर तुळशीराम गावित, महानगरप्रमुख मनोज मोरे आणि माजी नगरसेवक संजय वाल्हे यांनी राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांना निवेदन देऊन भुयारी गटारीच्या कामासंदर्भात गंभीर तक्रारी केल्या होत्या. धुळ्यात 131.54 कोटी रुपये किंमत असलेल्या भूमिगत गटार योजनेच्या पहिल्या टप्प्यात धुळे शहरातील देवपूर भागात गेल्या दोन ते तीन वर्षापासून काम सुरू आहे. हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे आणि तांत्रिक दृष्ट्या चुकीचे होत असल्याच्या तक्रारी अनेक वेळेस झाल्या. ?
संपूर्ण देवपूर परिसरातील प्रमुख लहान मोठ्या रस्त्यांवर ठेकेदाराने खोदकाम करून ठेवल्यामुळे रस्त्यांची दुर्दशा झाली.

भुयारी गटार योजना 147 किलोमीटरची

परिणामी नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या देवपूर भागातून एकूण चोवीस नगरसेवक महानगरपालिकेत निवडून जातात. त्यापैकी 19 नगरसेवक भाजपाचे असून यातील एकाही नगरसेवकांनी शहराच्या झालेल्या विदारक परिस्थितीबाबत आवाज उठवला नसल्याचे आरोप शिवसेनेने केला आहे. भुयारी गटार योजना 147 किलोमीटरची असून आतापर्यंत 125 किलोमीटरचे काम झाल्याची माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे देण्यात येते आहे. अजूनही 22 किलोमीटरचे काम बाकी आहे.

22 किलोमीटरचे काम अपूर्ण

आतापर्यंत ठेकेदाराला 95 कोटी रुपये दिले गेले आहेत. 131 .54 कोटी पैकी 95 कोटी दिल्यानंतर योजनेत केवळ 36 . 54 कोटी रुपये शिल्लक आहेत. ठेकेदाराने पुन्हा प्रॉपर्टी चेंबर व मेन चेंबरच्या कामाचे 28 कोटी रुपये देण्याची मागणी केली आहे. 36. 54 कोटी मधून 28 कोटी रुपये ठेकेदारास अदा केल्यास योजनेत फक्त 8.2 कोटी रुपये शिल्लक राहतात. अजून 22 किलोमीटरचे काम अपूर्ण आहे. यासाठी कमीत कमी तीस कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. याचा अर्थ महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि महानगरपालिका यांनी या ठेकेदाराला कामापेक्षा जास्तीचे बिल सादर केल्याची बाब स्पष्ट होते आहे.

14000 चेंबर केल्याचा ठेकेदाराचा दावा

हि अतिशय गंभीर बाब असून, त्यात भ्रष्टाचार देखील झाल्याचा संशय असून जास्तीचे पैसे घेऊन ठेकेदार रस्ते अर्धवट खोदून काम बंद करून गायब झाला आहे. या ठेकेदाराने आधी 28 कोटी रुपये दिल्यानंतरच काम चालू करेल अशी एक प्रकारे धमकी महानगरपालिका आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला दिल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. 28 कोटी रुपये प्रॉपर्टी चेंबर आणि मेन चेंबर असे 14000 चेंबर केल्याचा ठेकेदाराचा दावा आहे.

योजना पूर्णत्वास येण्याच्या अगोदरच मृतावस्थेत

हे शिवसेना महानगरच्या वतीने देवपुर परिसरात बऱ्याच भागात भेट देऊन पाहणी केली असता झालेले काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्‍याचे दिसून आले आहे. चेंबरची तूटफूट झाली आहे. जवळपास 132 कोटी रुपये किमतीचे योजनेतून अजून 132 लिटर देखील मलनिस्सारण झालेले नाही. योजना पूर्णत्वास येण्यास अजून अनेक महिने किंवा वर्ष देखील लागू शकतात. तोपर्यंत सर्व चेंबर मोडकळीस येण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही योजना पूर्णत्वास येण्याच्या अगोदरच मृतावस्थेत आहे.

गेल्या वर्षी झालेल्या पाऊस आणि खोदलेले रस्त्‍यामुळे देवपूर परिसरात चिखलाने भरलेले रस्ते दिसत आहेत. यातून नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला आहे. शासनाचे शेकडो कोटी रुपये अशा निकृष्ट कामामुळे पाण्यात गेले आहेत. पुढील शंभर वर्षाचे नियोजन डोळ्यासमोर ठेवून महत्त्वपूर्ण असलेल्या या योजनेची अंमलबजावणी काटेकोरपणे होणे अपेक्षित होते. मात्र महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि धुळे मनपाने या कामावर नियंत्रण ठेवणे अपेक्षित असताना त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसते आहे. त्यामुळे या कामाची गुणवत्ता न तपासता केलेल्या कामापेक्षा जास्तीचे बिल देण्याचे काम संबंधितांनी केले आहे.

मंत्री गुलाबराव पाटील यांनी या योजनेची चौकशी करण्याचे आदेश दिले

या योजनेच्या कामाची आता एक समिती नेमून चौकशी करावी, त्याशिवाय ठेकेदारास पुढे देयके अदा करू नयेत तसेच गैरकारभार करणाऱ्या ठेकेदार व ठेकेदारास गैर कारभारात मदत करणाऱ्या धुळे महानगरपालिका, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्यावर कठोर स्वरूपाची कारवाई करण्याची मागणी शिवसेनेने केल्याने पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी या योजनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news