नांदेड : कारची ऊसाच्या ट्रॉलीस पाठीमागून धडक; दोन पोलिस ठार | पुढारी

नांदेड : कारची ऊसाच्या ट्रॉलीस पाठीमागून धडक; दोन पोलिस ठार

नांदेड, पुढारी वृत्तसेवा

भोकर येथील पोलीस मित्राच्या घरी जेवणाचा कार्यक्रम उरकून नांदेडकडे परत येत असलेल्या पोलीस कर्मचार्‍याच्या कारने रस्त्यावर उभे असलेल्या ऊसाच्या ट्रॉलीस पाठीमागून धडक दिली. या अपघातात दोन पोलीस कर्मचारी जागीच ठार झाले तर दोन जण गंभीर जखमी झाले. हा अपघात रविवारी रात्री उशीरा भोकर रस्त्यावरील खरबी येथे घडली.

पोलीस मुख्यालयात नेमणुकीस असलेले पोलीस कर्मचारी सुनील सांभाळकर यांच्या भोकर येथील घरी रविवारी जेवणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी दीपक देवानंद जाधव, ईश्‍वर सुदाम राठोड, प्रितेश ईटळगावकर आणि सदानंद सपकाळ गेले होते.

कार्यक्रम आटोपल्यानंतर रात्री उशीरा चारचाकी वाहनाने (क्र.एम एच 26 व्ही 1868) येत असताना रात्री 10 वाजण्याच्या सुमारास भोकर – नांदेड महामार्गावर खरबी शिवारात अभ्‍या असलेल्या ऊसाच्या ट्रॅक्टर (एम.एच.26 ए आर 1156) ट्रॉलीला मागून धडक दिली. या अपघातात ईश्‍वर राठोड आणि दीपक जाधव हे जागीच ठार झाले तर सदानंद सपकाळ, प्रितेश ईटळगावकर हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना नांदेड येथे एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

भोकरचे पोलीस निरीक्षक विकास पाटील, पोलीस उपनिरीक्षक सूर्यकांत कांबळे, जमादार हनुवते आणि राजेश दुथडे हे कर्मचारी घटनास्थळावर पोहोचल्यानंतर जखमींना नागरिकांच्या मदतीने नांदेड येथे हलविले तर मृत्‍यूमुखी पडलेल्‍या दोघांचे मृतदेह भोसी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविण्यात आले होते.  तपास भोकर पोलीस करीत आहेत.

हे वाचलं का?

Back to top button