धुळे शहरात ( Dhule ) अंमली पदार्थाची तस्करी करणा-यांवर पोलिस महानिरीक्षकांच्या पथकाने धडाका लावला आहे. मुंबई-आग्रा महामार्गावर रिक्षामधून गांजाची तस्करी करणा-या पाच जणांना पोलिस महानिरीक्षक बी. जी. शेखर यांच्या पथकाने रंगेहात पकडले आहे. या कारवाईत चार लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
धुळे शहरात ( Dhule ) मुंबई-आग्रा महामार्गावर गांजाची वाहतुक होणार असल्याची माहिती मिळाल्याने पोलिस महानिरीक्षक बी. जी. शेखर यांच्या पथकाला मिळाली. त्यानुसार या पथकाने चाळीसगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत असणा-या हॉटेल देश-विदेशच्या जवळ एक रिक्षा (क्र. एमएच ५ बी.जी. ४३१८) संशयीतपणे उभी असल्याचे दिसून आली. त्यानंतर पथकाने कारवाई करत रिक्षाची तपासणी केली. या कारवाईत रिक्षातून सुमारे चार लाख रुपये किमतीचा गांजा जप्त केला.
तसेच मोईनुदीन शहा, सत्तार शहा, राहुल बापु कुवर, बन्सीलाल रमेश गोसावी, राजू शेख हसन शेख आणि अलीम शहा या पाचही जणांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या विरेाधात चाळीसगाव रोड पोलिस ठाण्यात एनडीपीएस ॲक्ट 1985 या कायद्यातील कलम २० व २२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, धुळ्यातील मुंबई- आग्रा महामार्गावर एका तरुणाकडून सुमारे आठ लाख रुपये किमतीचे अर्धा किलो ब्राऊन शुगरचा साठा जप्त करण्यात आला. गेल्या दोन दिवसांपासून अंमली पदार्थाची मोठी खेप धुळ्यात येणार असल्याची माहिती विशेष पोलिस महानिरीक्षक बी. जी. शेखर व मोहाडी पोलिसांना मिळाल्याने पथक या तस्कराच्या मागावर होते. अखेर त्याला बेड्या ठोकण्यात यश मिळाले.
या घटनेची गंभीर दखल धुळ्याचे पोलिस अधिक्षक प्रविणकुमार पाटील व अपर पोलिस अधिक्षक प्रशांत बच्छाव यांनी घेतली आहे. या आरोपीची कसुन चौकशी करणे सुरु झाले आहे. हा साठा नाशिक, पुणे किंवा मुंबई येथे मुंबई आग्रा महामार्गावरुन रवाना होण्याची शक्यता देखील पोलिस तपासून पाहत आहेत.