धुळे : पुढारी वृत्तसेवा
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना उड्डाणपूल संदर्भातील निवेदन देण्यासाठी गेलेल्या शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या कार्यकर्ते आणि माजी मंत्री आमदार जयकुमार रावल यांच्यात शाब्दिक खडाजंगी उडाली. यावेळी आमदार रावल यांच्या समर्थकांनी धक्काबुक्की केल्याचा आरोप करीत ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी मंत्री दानवे आणि आमदार राहुल यांच्या विरोधात घोषणाबाजी केली.
संबधित बातम्या :
शिंदखेडा तालुक्यातील विविध कामांच्या उद्घाटनासाठी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे आगमन झाले. यावेळी शिंदखेडा तालुक्यातील जुना शहादा रस्त्यावरील रेल्वे मार्गावरील उड्डाणपुलाचे काम प्रलंबित असल्याचा निवेदन देण्यासाठी तालुकाप्रमुख शानाभाऊ सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखालील शिष्ट मंडळ गेले होते. मंत्री दानवे ही रेल्वेने येणार असल्याने त्यांच्या प्रतीक्षेत असणाऱ्या शिवसैनिकांनी रेल्वे स्थानकावरील ओट्यावर बसकाण मारली. यावेळी आंदोलनाचा अंदाज आल्याने पोलिसांनी या कार्यकर्त्यांना गराडा घातला. मात्र मंत्री दानवे आल्यानंतर आमदार जयकुमार रावल आणि त्यांच्या समर्थकांनी शाब्दिक वाद घालून धक्काबुक्की केल्याचा आरोप करीत शिवसेनेच्या ठाकरे गट आक्रमक झाला. या गटाने मंत्री रावसाहेब दानवे आणि आमदार जयकुमार रावल यांच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करून गोंधळ घालण्यास सुरुवात केली .त्यामुळे पोलीस पथकाने या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
या संदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना आंदोलन करणारे शानाभाऊ सोनवणे यांनी सांगितले आहे की, जुना शहादा रस्त्यावर रेल्वे रूळ नजीक उड्डाणपुलाचा प्रश्न गेल्या चार ते पाच वर्षांपासून प्रलंबित आहे. वारंवार मागणी करून त्याचप्रमाणे रेल्वे रोको आंदोलन करून देखील हा प्रश्न सुटत नसल्याने शिवसैनिक मंत्री दानवे यांना निवेदन देण्यासाठी आले होते. मात्र आमदार रावळ यांनी धक्काबुक्की केल्याने शिवसैनिकांनी देखील राडा घातल्याचे त्यांनी म्हटले आहे. यावेळी शेतकऱ्यां संदर्भात चुकीचा शब्द वापरल्याने मंत्री दानवे यांचा निषेध केल्याचे त्यांनी म्हटले. यापुढे शिंदखेडा मतदार संघामध्ये रस्ते, शाळा यांच्या दुरावस्था आहे. विकासाची कामे होत नसल्याने यापुढे तालुक्यात मंत्र्यांना गावबंदी केली जाईल. तसेच त्यांना काळे झेंडे देखील दाखवले जातील असा इशारा देखील त्यांनी दिला आहे.
हेही वाचा :