Pune BRT News : नगर रस्त्यावरील BRT मार्गावरून राजकीय कलगीतुरा! | पुढारी

Pune BRT News : नगर रस्त्यावरील BRT मार्गावरून राजकीय कलगीतुरा!

येरवडा(पुणे); पुढारी वृत्तसेवा : नगर रस्त्यावरील बीआरटी मार्गावरून आमदार आणि माजी उपमहापौर यांच्यात शीतयुद्ध रंगले असताना आता त्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटानेही उडी घेतली आहे. महापालिका प्रशासन बीआरटी हाताळण्यास सक्षम नाही. मूळ हेतू साध्य झाला नसल्याने हा प्रकल्प फसल्याचे पक्षाने म्हटले आहे. भाजपच्या चिन्हावर निवडून आलेले माजी उपमहापौर हे भाजपची भूमिका मांडत की आरपीआयची, हे स्पष्ट करावे, असा टोला राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने लगावला आहे.

बीआरटी मार्ग काढायचा की नाही, यावरून रागकीय पक्षांत सध्या कलगीतुरा रंगल्याचे दिसून येत आहे. नगर रस्त्यावरील बीआरटी मार्गामुळे वाहतूक कोंडी होत असून, तो काढण्यासाठी आमदार सुनील टिंगरे प्रशासनाकडे पाठपुरावा करीत आहेत. तर माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी सर्वसामान्य जनतेसाठी व सार्वजनिक वाहतूकव्यवस्था सक्षम होण्यासाठी बीआरटी मार्ग असावा, अशी भूमिका घेतली आहे. तो काढल्यास आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे वडगाव शेरी मतदारसंघाचे अध्यक्ष आशिष माने यांनी याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, महापालिका प्रशासन तसेच वाहतूक पोलिस बीआरटी मार्गात खासगी वाहनांचा शिरकाव रोखू शकलेले नाहीत. बीआरटीवर केलेला सर्व खर्च वाया गेला आहे. प्रत्येकी 30 ते 35 लाख रुपये खर्चून केलेले बसथांबे मेट्रोसाठी काढण्यात आले आहेत.

इतर बस थांब्यांचीही दुरवस्था झाली आहे. खासगी वाहने व पीएमपी बसचे अपघात होऊन अनेकांचे जीव गेले असून, कित्येक जण जखमी झाले आहेत. रस्त्याचा 40 टक्के भाग हा बीआरटी मार्गासाठी राखीव ठेवला आहे. जर मार्ग काढला, तर मिळणार्‍या रस्त्यावरून इतर वाहनचालकदेखील वेगाने जातील व पीएमपी बसदेखील अधिक वेगाने जाऊ शकतील.

डॉ. धेंडे म्हणाले की, मेट्रोच्या कामामुळे बीआरटी मार्गाची दयनीय अवस्था झाली आहे. या मार्गाची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी. बीआरटी काढल्यास नव्याने येणार्‍या इलेक्ट्रिकल बस कुठे धावतील? ही मंडळी मार्ग काढण्याचा आग्रह का करतात? त्यापेक्षा त्यांना अतिक्रमण दिसत नाही का? याबाबत प्रवाशांचीही मतेही विचारात घ्यावीत. स्वतःच्या मालकीच्या गाडीतून फिरणार्‍यांना गोरगरीब जनतेचा कमी वेळात होत असलेला सुखकर प्रवास कसा काय सहन होणार? असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

भाजपच्या चिन्हावर निवडून आलेल्या माजी उपमहापौर हे भाजपची भूमिका मांडत की आरपीआयची, हे आधी स्पष्ट करावे. महापालिका प्रशासन तसेच वाहतूक पोलिस बीआरटीतील खासगी वाहनांचा शिरकाव रोखू शकलेले नाहीत. बीआरटीत झालेल्या अपघातांत आतापर्यंत अनेकांचे बळी गेले आहेत.

– आशिष माने, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)
वडगाव शेरी मतदारसंघ

मी आरपीआयकडून नगरसेवक होतो. त्यामुळे आरपीआयची भूमिका मांडत आहे. बीआरटी ही यूपीए सरकार असताना झाली. शरद पवार यांचीदेखील त्या वेळी बीआरटी पाहिजे, अशी भूमिका होती. आशिष माने बीआरटी मार्गाला करीत असलेला विरोध हा शरद पवार यांना मान्य आहे का?

– डॉ. सिद्धार्थ धेंडे, माजी उपमहापौर

हेही वाचा

Pune News : खराडीत रहिवाशांचा ‘एसआरए’ला विरोध; पक्की घरे बांधून देण्याची मागणी

Jalgaon : एरंडोल जवळ खासगी ट्रॅव्हल्सला अपघात; दोन ठार, १२ प्रवासी जखमी

कोल्‍हापूर : भरधाव डंपरने दुचाकीस्वारास चिरडले; तरुण जागीच ठार

Back to top button