

धुळे: महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने 50 जागा मिळवत सत्तेच्या चाव्या आपल्या हातात ठेवल्या आहे. या निवडणुकीत उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या शिवसेनेला पाच तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला आठ जागा मिळाल्या आहेत. तर एमआयएमने दहा जागा मिळवून भाजपाच्या खालोखाल आपली शक्ती दाखवली आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांची शिवसेना, शरद पवार राष्ट्रवादी तसेच काँग्रेसला आपले खाते देखील उघडता आले नाही.
धुळे महापालिकेच्या 74 पैकी चार ठिकाणी प्रभाग एक मधून उज्वला भोसले, प्रभाग सहामधून ज्योत्स्ना पाटील तर प्रभाग 17 मधून अमोल मासुळे आणि सुरेखा उगले हे भाजपचे चार उमेदवार आधीच बिनविरोध निवडून आले. मतमोजणीच्या सुरुवातीलाच प्रभाग 17 मधून भाजपला मोठा झटका लागला. स्थायी समितीचे माजी सभापती शितलकुमार नवले आणि भाजपच्या सुनंदा माळी यांना पराभवाचा झटका बसला. गीता नवले यांनी सुनंदा माळी आणि नीलिमा पाटील यांचा तर प्रथमच निवडणूक लढवणारे नवखे उमेदवार धीरज कलंत्री यांनी शीतलकुमार नवले यांचा पराभव केला. परंतु अल्पसंख्यांक विभाग आणि दोन अन्य प्रभाग वगळता सर्व प्रभागांमध्ये मतदारांनी भाजपच्या उमेदवारांना पसंती मिळाल्याचे निकालाअंती स्पष्ट झाले.
प्रभाग चारमधून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या शहनाज बी खाटीक, इरफान फजलूर रहमान अन्सारी, प्रवीण बी शेख, तौहिद अनम शेख या विजयी झाल्या. तर प्रभाग 13 मधून राष्ट्रवादीच्या शहबाज फारुक शाह, फातिमा बी नूरुल अमीन, नजमा शाह, मतीन पठाण हे चौघे विजयी झाले. या प्रभागातील लढतीकडे अवघ्या धुळेकरांचे लक्ष वेधले होते. या प्रभागातून माजी आमदार फारुक शाह यांचे चिरंजीव शहाबाज खान हे निवडणुकीच्या रिंगणात होते. प्रचारात भाजपचे आमदार अनुप अग्रवाल यांनी शहाबाज शाह यांना महापौर करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोपही विरोधकांवर केला होता. त्यामुळे या लढतीकडे धुळेकरांचे लक्ष लागून होते. या प्रभागात राष्ट्रवादीने एमआयएमचा दणदणीत पराभव केला.
महापालिकेच्या या निकालामध्ये एमआयएमने आपली शक्ती वाढल्याचे दिसून आले. गेल्यावेळी एमआयएमचे चार नगरसेवक होते. पण आता निकालानंतर एमआयएमने दहा नगरसेवक निवडून आणले आहे. प्रभाग 14 मधून मन्सुरी कासिम, हसीना अली, शेख शहाजन, मिर्झा बेग हे निवडून आले. प्रभाग 15 मधून एमआयएमचे युसुफ मुल्ला, हालिमा अन्सारी, आमेराबानो अन्सारी, अब्दुललतिफ अन्सारी विजयी झाले. या प्रभागामध्ये काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष तथा माजी नगरसेवक साबीर शेख यांचा मुलगा अबुलास साबीर शेख तसेच उपमहापौर सवाल अन्सारी यांचा मुलगा उजेर अन्सारी यांना पराभवाचा झटका बसला. प्रभाग 19 मधून एमआयएमच्या दोन जागा निवडून आल्या. यात मदिना समशेर पिंजारी आणि अमीर असलम पठाण यांचा समावेश आहे. तर याच प्रभागातून एकमेव अपक्ष उमेदवार निवृत्त पोलिस कर्मचारी रऊफ पठाण हे विजयी झाले.
दरम्यान शिंदे उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या शिवसेनेने देखील या निवडणुकीत पाच जागा मिळवल्या आहेत. यात प्रभाग 17 मधून गीता तुषार नवले तसेच धीरज कलंत्री हे विजयी झाले. तर प्रभाग 18 मधून मंगला सुनील सोनवणे यांनी यश मिळवले. प्रभाग 16 मधून शिवसेनेचे दीपक खोपडे यांचा विजय झाला. तर उर्वरित तीन जागांवर भाजपने विजय मिळवला. प्रभाग चारमधून छाया अहिरे यांनी विजय मिळवला.
या निवडणुकीमध्ये उर्वरित सर्वच प्रभागांमध्ये भारतीय जनता पार्टीने आपला विजय नोंदवत 50 जागांपर्यंत मजल मारली आहे. प्रभाग 18 मधून चित्रलेखा विकी परदेशी तर प्रभाग 11 मधून मायादेवी महादेव परदेशी या सून आणि सासू विजयी झाले आहेत.
उद्धव ठाकरे यांची शिवसेना ,शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांना आपले खाते देखील उघडता आले नाही. या तीनही पक्षांचा दारुण पराभव झाला आहे. विशेष म्हणजे महाविकास आघाडीचे नेतृत्व खासदार डॉक्टर शोभाताई बच्छाव यांचे पती दिनेश बच्छाव यांच्याकडे देण्यात आले होते. मात्र महाविकास आघाडीच्या या नेतृत्वाला एकही जागा निवडून आणता आली नाही.