

जळगाव : राज्यांतील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांचे निकाल आज जाहीर होत असून, संपूर्ण राज्याचे लक्ष जळगावकडे वेधले गेले आहे. जळगाव महानगरपालिका निवडणुकीत एक अतिशय थरारक आणि अनोखा निकाल समोर आला आहे. शिवसेना (शिंदे गट) तर्फे निवडणूक लढवणारे माजी महापौर ललित कोल्हे यांनी चक्क कारागृहातून निवडणूक लढवत विजयश्री खेचून आणली आहे. विशेष म्हणजे, कोल्हे कुटुंबातील एकाच वेळी तिघेजण विजयी झाल्याने जळगावात 'कोल्हे पॅटर्न'ची जोरदार चर्चा सुरू आहे.
बोगस कॉल सेंटर प्रकरणी सध्या नाशिक कारागृहात असलेले ललित कोल्हे यांनी जेलमधूनच आपले नामनिर्देशन पत्र दाखल केले होते. प्रभाग क्रमांक ११ मधून मैदानात उतरलेल्या कोल्हे यांच्यासमोर महाविकास आघाडीचे मोठे आव्हान होते. मात्र, मतदारांनी त्यांच्या पारड्यात कौल देत त्यांना पुन्हा एकदा महापालिकेत पाठवले आहे. कारागृहात असतानाही मिळालेला हा विजय राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.
या निवडणुकीत केवळ ललित कोल्हेच नव्हे, तर त्यांच्या कुटुंबातील इतर दोन सदस्यांनीही विजयी बाजी मारली आहे.
ललित कोल्हे : प्रभाग ११ मधून विजयी (नाशिक कारागृहातून निवडणूक लढवली).
पियुष कोल्हे (मुलगा) : प्रभाग ४ मधून विजय.
सिंधू कोल्हे : कुटुंबातील तिसऱ्या सदस्य म्हणून विजयी.
पिता-पुत्रासह कुटुंबातील तिघेजण विजयी झाल्याची बातमी समजताच कोल्हे समर्थकांनी जळगावात एकच जल्लोष केला. शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या आणि ललित कोल्हे यांच्या पत्नी सरिता कोल्हे यांना आपला आनंद रोखता आला नाही; निकाल ऐकताच त्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. ‘हा विजय जनतेने आमच्या कामावर दाखवलेला विश्वास आहे,’ अशी भावना समर्थकांकडून व्यक्त केली जात आहे.