

धुळे: मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर नायलॉन मांजाची साठवणूक आणि विक्री करणाऱ्या एकास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने साक्री शहरातून रंगेहात पकडले आहे. त्याच्या ताब्यातून मांजाचा साठा जप्त करण्यात आला आहे. दरम्यान नायलॉन मांजा प्रकरणात कोणतीही गंभीर घटना घडल्यास संबंधितांची गय केली जाणार नाही. यात सदोष मनुष्यवधासारखा गंभीर गुन्हा दाखल करण्याचा इशारा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिला आहे.
मकर संक्रांतीनिमित्ताने मोठ्या प्रमाणावर पतंगबाजी केली जाते. यासाठी गेल्या काही वर्षांपासून नायलॉन मांजाचा वापर केला जातो. या मांजामुळे दुचाकी चालकांना गंभीर स्वरूपाच्या जखमा होऊन दुर्घटना देखील घडल्या आहेत. देशभरातील या घटना पाहता न्यायालयाने देखील अशा प्रकारचा धागा वापरण्यास तीव्र आक्षेप नोंदवला आहे. मांजाचे वापरामुळे होणाऱ्या दुर्घटनांना प्रतिबंध होण्यासाठी उच्च न्यायालयाच्या खंडपीठ छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने स्वतःहून दखल घेऊन जनहित याचिका दाखल करून घेतली.
सुनावणी आदेशात नायलॉन मांजाच्या वापरा संदर्भात प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्याबाबत निर्देश प्राप्त आहेत. त्यानुसार पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी पतंगबाजी करीता नायलॉन व चायनिज मांजाची वाहतुक, खरेदी-विक्री व वापर होणार नाही याकरिता संबंधीतांवर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार जिल्हा भरातील पोलीस दल सतर्क झाले आहे. याच संदर्भात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक श्रीराम पवार यांना साक्री शहरात अशा प्रकारचा वादग्रस्त धागा साठवणूक आणि विक्री होत असल्याची माहिती मिळाली.
या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे पथक व साक्री पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार यांनी साक्री शहरातील लोकमान्य नगरातील योगेश सुनिल जगताप याच्या घराच्या मागे छापा टाकला असता त्याचे कब्जातील दोन प्लॅस्टिकच्या झोल्यांमध्ये प्रतिबंधित नायलॉन मांजा मिळुन आला. आरोपी योगेश सुनिल जगताप याचे कब्जातुन 27,हजार 500 रू.किं.चा नायलॉन मांजा हस्तगत करुन साक्री पोलीस ठाणे येथे बिएनएस 223 सह पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 चे कलम 5, 15 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.