

धुळे: धुळे महानगरपालिकेच्या 70 जागांसाठी सकाळपासून मतदान सुरू झाले आहे. सकाळच्या सत्रात धुळेकरांमध्ये मतदानाविषयी निरुत्साह दिसून येतो आहे. विशेषता लाडक्या बहिणी अजूनही घरातून मोठ्या प्रमाणावर निघाल्या नसल्याचे चित्र स्पष्ट आहे. सकाळी साडे अकरा वाजेपर्यंत धुळ्यात 14 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. दरम्यान प्रभाग क्रमांक सहा मधील विद्यालयात ईव्हीएम मशीन बंद झाल्याची घटना घडली आहे. या मतदान केंद्रात भारतीय जनता पार्टीसह विरोधी पक्षाच्या निवडणूक प्रतिनिधींनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यावर ताशेरे ओढले आहेत.
धुळे महानगरपालिकेच्या 74 जागांसाठी निवडणूक प्रक्रिया जाहीर करण्यात आली होती .यातील चार जागा यापूर्वीच बिनविरोध झाल्या आहे. या चारही जागा भारतीय जनता पार्टीच्या आहेत. दरम्यान आता सकाळपासून 70 जागांसाठी मतदानाची प्रक्रिया राबवण्यात येते आहे. यासाठी 316 उमेदवार रिंगणात असून पाचशे सात बुथवर मतदान सुरू करण्यात आले आहे.
धुळे महानगरपालिकेसाठी दोन लाख 21 हजार 764 पुरुष तर दोन लाख 8 हजार 578 महिला व 41 इतर असे चार लाख तीस हजार 383 मतदार आहेत. सकाळच्या सत्रात मतदारांनी सर्वच मतदान केंद्राकडे पाठ फिरवल्याचे चित्र दिसून आले. सकाळी साडे नऊ वाजेला 13,875 पुरुष तर 9840 महिला व बारा इतर अशा 23 हजार 727 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला .या सत्रात अवघे 5.51 टक्के मतदार झाले. तर सकाळी साडेअकरा वाजेला 33 हजार 677 पुरुष व 27 हजार 568 महिला तसेच 14 इतर अशा 61 हजार 249 मतदारांनी मतदान केले. या सत्रात 14.23 टक्के मतदानाची नोंद झाली आहे.
लाडकी बहीण योजनेच्या पार्श्वभूमीवर महिलांची मोठ्या प्रमाणावर मतदान केंद्रावर गर्दी राहील, अशी अपेक्षा होती. मात्र सकाळी साडेनऊ आणि साडेअकरा वाजेची आकडेवारी पाहता महिलांची संख्या पुरुषांच्या तुलनेत कमी असल्याचे दिसून आले आहे. दरम्यान प्रभाग क्रमांक सहा मधील कानुश्री विद्यालयात ईव्हीएम मशीन मध्ये बिघाड झाल्याची घटना निदर्शनास आली. या ईव्हीएम मशीन मध्ये उमेदवारांची प्रभाग निहाय नावे अल्फाबेटीकल पद्धतीने नसल्याने भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांनी नाराजी व्यक्त केली आहे. तर विरोधी पक्षाच्या निवडणूक प्रतिनिधींनी देखील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांवर गंभीर स्वरूपाचे ताशेरे ओढले आहेत.