Thalner Police Suspension Bribery Case
धुळे : अंमली पदार्थाच्या गुन्हयामध्ये अटक न करण्यासाठी दोन लाखांची लाच स्वीकारल्या प्रकरणात शिरपूर तालुक्यातील थाळनेर पोलीस ठाण्यातील चौघा पोलीस कर्मचाऱ्यांना रंगेहात पकडण्यात आले आहे. या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या प्रकरणात आता थाळनेर पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक शत्रुघ्न पाटील आणि चौघा लाचखोर पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.
पोलीस ठाण्यातील अंमलदारावर नियंत्रण नसल्याचा ठपका ठेवून पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी पाटील यांना निलंबित केले आहे. त्यांच्या जागी शिरपूर पोलीस ठाणे येथून सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत निंबा पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
या घटनेतील तक्रारदार हे शिरपूर तालुक्यातील मौजे महादेव दोंदवाडा, नागेश्वर पाडा येथील रहिवासी असुन त्यांच्या वडीलांविरुध्द थाळनेर पोलीस स्टेशन येथे अंमलीपदार्थ विरोधी अधिनियमान्वये गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यामध्ये अटक न करण्यासाठी थाळनेर पोलीस स्टेशनचे हवालदार भुषण रामोळे, पो.कॉ. धनराज मालचे, किरण सोनवणे व मुकेश पावरा यांनी तकारदार यांच्या वडीलांकडे ३ लाख रुपये लाचेची मागणी केल्याची तक्रारदार यांनी दुरध्वनीव्दारे माहिती दिली होती.
या माहितीवरुन धुळे ला.प्र. विभागाच्या पथकाने उपअधीक्षक सचिन साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपुर तालुक्यातील बभळाज येथे जावुन तक्रारदार यांची तक्रार नोंदवुन घेतली. या तक्रारीवरुन पडताळणी केली असता हवालदार भुषण रामोळे, पो.कॉ. धनराज मालचे, किरण सोनवणे व मुकेश पावरा यांनी तक्रारदार यांच्याकडे पंचांसमक्ष तडजोडीअंती २ लाख रुपये लाचेची मागणी करुन लाच स्विकारण्याचे मान्य केले होते. ही बाब स्पष्ट झाली.
त्यामुळे सापळा कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार सापळा कारवाई केली असता पो.कॉ. मुकेश पावरा यांनी तक्रारदार याच्याकडुन २ लाख रुपये लाचेची रक्कम स्वतः स्विकारली असता त्यांना रंगेहात पकडण्यात आले आहे. त्यामुळे चौघा संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लाचखोर कर्मचारी आणि प्रभारी अधिकारी निलंबित
दरम्यान या घटनेमुळे पोलीस दलात खळबळ उडाली असून या प्रकरणात पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी तातडीने थाळनेर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक शत्रुघ्न पाटील यांना तात्काळ निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. लाच स्वीकारल्याच्या या गुन्ह्यावरून पोलीस ठाण्यामधील अंमलदार तसेच कर्मचाऱ्यांवर प्रभारी अधिकारी म्हणून शत्रुघ्न पाटील यांचे नियंत्रण नसल्याचे दिसून येत असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
त्याचप्रमाणे या संदर्भात गुन्हे आढावा बैठकांमध्ये सूचना देऊन देखील लाच स्वीकारल्याचा गुन्हा घडला आहे. त्यामुळेच कारवाई केली गेली असल्याचे देखील नमूद करण्यात आले आहे. निलंबनाच्या कालावधीत पाटील यांना व्यवसाय किंवा अन्य ठिकाणी नोकरी करता येणार नाही असे केल्यास त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे .
दरम्यान, लाच स्वीकारणाऱ्या चौघा कर्मचाऱ्यांना देखील पोलीस सेवेतून निलंबित करण्याचे आदेश काढण्यात आले आहे. थाळनेर पोलीस ठाण्यातून निलंबित केलेल्या शत्रुघ्न पाटील यांच्या जागी शिरपूर पोलीस ठाणे येथून सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत निंबा पाटील यांची नियुक्ती करण्याचे आदेश देखील पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी काढले आहेत.