

Dhule Parvati Jogi EVM Malfunction: धुळे महानगरपालिका निवडणुकीदरम्यान मतदान प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, प्रभाग क्रमांक 16 मधील शिवसेना उमेदवार पार्वती जोगी यांनी मतदान यंत्रांमध्ये गंभीर बिघाड असल्याचा आरोप केला आहे. “आमच्या पक्षाचं बटन दाबलं जात नाही, भाजपचं बटन आपोआप दाबलं जात आहे,” असा धक्कादायक दावा त्यांनी केला आहे.
मतदान केंद्रांची पाहणी करताना पार्वती जोगी यांनी प्रतिक्रिया दिली की, “मतदान यंत्रांमध्ये जाणीवपूर्वक बिघाड करण्यात आला आहे. सर्व यंत्रणा मॅनेज असल्यासारखी परिस्थिती आहे. लोकशाहीला वेठीस धरलं जात आहे,” असा आरोप त्यांनी केला. या प्रकारामुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाल्याचंही त्यांनी सांगितलं.
तक्रारी आल्यानंतर पार्वती जोगी यांनी संबंधित मतदान केंद्रांना भेट दिली. यावेळी त्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांशी संवाद साधत तात्काळ चौकशीची मागणी केली. काही मतदारांनीही यंत्र नीट काम करत नसल्याच्या तक्रारी केल्याचा दावा त्यांनी केला आहे.
या बिघाडाबाबत अधिकृत तक्रार निवडणूक अधिकाऱ्यांकडे दाखल करणार असल्याचं पार्वती जोगी यांनी सांगितलं. मतदान प्रक्रिया निष्पक्ष आणि पारदर्शक असावी, अशी मागणी करत त्यांनी संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, या आरोपांवर अद्याप निवडणूक प्रशासनाकडून अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार प्रत्येक तक्रारीची तपासणी केली जाते आणि आवश्यक असल्यास तांत्रिक तपासणीही केली जाते, असं प्रशासनाकडून पूर्वी स्पष्ट करण्यात आलं आहे. धुळे शहरात मतदान सुरू असतानाच अशा आरोपांमुळे निवडणूक प्रक्रियेच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित होत आहेत.