

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
'जीएसटी' आल्यानंतर त्याची घडी बसताना सुरुवातीला अनेक अडचणी आल्या. परंतु, आता सिस्टिम बसली आहे. त्यामुळेच विक्रमी जीएसटी संकलन झाल्याचे केंद्र सरकारने जाहीर केले आहे. यापूर्वीची प्रकरणे नियमित करण्यासाठी केंद्र सरकारनेही राज्य सरकारच्या धर्तीवर अॅम्नेस्टी स्कीम आणावी, अशी अपेक्षा खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली.
सीए इन्स्टिट्यूटच्या नाशिक शाखेच्या वतीने अशोका मार्ग येथील सीए इन्स्टिट्यूटच्या सभागृहात आयोजित केलेल्या परिसंवादात खासदार सुळे बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर माजी आमदार हेमंत टकले, सीए इन्स्टिट्यूटच्या नाशिक शाखेचे अध्यक्ष सोहिल शहा, ज्येष्ठ सीए शिवदास डागा, डब्ल्यूआयआरसीचे खजिनदार पीयूष चांडक, सीए इन्स्टिट्यूटचे सचिव संजीवन तांबूळवाडीकर आदी उपस्थित होते. याप्रसंगी खासदार सुळे म्हणाल्या की, राज्य सरकारने आणलेल्या अॅम्नेस्टी स्कीमचा फायदा करदात्यांसह सरकारलाही झाला. जीएसटीवर निर्णय घेण्यासाठी जीएसटी कौन्सिलची स्थापना करण्यात आली आहे. परंतु, अनेकदा कौन्सिलमधील गोष्टी रेटल्या जातात, त्यांची अंमलबजावणी होत नाही. याबाबत आपण केंद्रीय अर्थमंत्री सीतारमण यांच्याशीही बोललो असल्याचे त्या म्हणाल्या.
सरकारने फेसलेस टॅक्सेशन केले आहे. परंतु, हा कायदा करताना सहकारातील कायद्यांचा विचार करण्यात आलेला नाही. त्यामुळे अशा संस्थांना नोटिसा येतात. मग ते सीएंकडे येतात आणि मग सुनावण्या होतात, त्यांना पैसे भरावे लागतात. प्रत्येकजण आपापल्या जागेवर बरोबर असतो. राज्याच्या अॅम्नेस्टी स्कीममुळे लोक समाधानी आहेत. 2017-18 आणि 2018-19 या दोन वर्षांसाठी केंद्र सरकारनेही अॅम्नेस्टी स्कीम आणावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
यावेळी सीए उल्हास बोरसे यांनी औद्योगिक धोरणांमधील विरोधाभास दाखवून देत तो दूर करण्याची मागणी केली. यावेळी सीएंच्या अडचणी त्यांनी ऐकून घेतल्या. कॉर्पोरेट अफेअर्स मंत्रालयाने सीएंना सरकारच्या धोरणांविरोधात सोशल मीडियावर बोलण्यास बंधने घातली जात आहेत. सरकार या संस्थांना एक रुपयाही मदत देत नाही. त्यामुळे सरकारने त्यात हस्तक्षेप करू नये, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावेळी त्यांनी राज ठाकरे यांच्या भोंगे प्रकरणावरही टीका केली. दम कोणाला दिला आणि पहिल्यांदा शिर्डीचा भोंगा खाली उतरला, असे म्हणत त्यांनी राज यांच्या मोहिमेवर टीका केली. कोरोना काळात आपण उपचार घेताना डॉक्टरांचा जात-धर्म विचारत होतो का, असा सवाल करतानाच त्यांनी सध्याच्या जाती-धर्माच्या राजकारणाचाही समाचार घेतला.
..तर माझ्यावरही रेड पडेल
लोकशाहीत आपले म्हणणे मांडणे गरजेचे आहे. मी बोलले तर काय होईल, फार तर माझ्यावर रेड पडेल. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर तब्बल 109 वेळा रेड पडली. हा जागतिक विक्रम असल्याचे सांगून खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारवर अप्रत्यक्षपणे टीका केली.