पतसंस्थांच्या ठेवींना लवकरच विमा संरक्षण : उपमुख्यमंत्री अजित पवार

पतसंस्थांच्या ठेवींना लवकरच विमा संरक्षण : उपमुख्यमंत्री अजित पवार
Published on
Updated on

सांगली; पुढारी वृत्तसेवा : नागरी सहकारी बँकांच्या 5 लाखांपर्यंतच्या ठेवींना विमा संरक्षण आहे. त्या धर्तीवर राज्यातील सहकारी पतसंस्थांमधील ठेवींना विमा संरक्षण देण्याबाबत धोरण ठरविण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगलीत केली. राष्ट्रीयकृत बँका बड्या कर्जदारांना कर्जात पन्नास टर्क्क्यांपर्यंत सवलत देतात. दुसरीकडे मात्र गोरगरिबांची भांडीकुंडीही जप्त केली जातात. थकित कर्जाच्या सेटलमेंटबाबत दिल्ली ते गल्ली एकच धोरण असले पाहिजे, असे मतही पवार यांनी व्यक्त केले.

कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्थेच्या प्रशस्त मुख्यालय इमारतीचे उद्घाटन उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते झाले. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, कृषी व सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन अनिल पाटील, महापौर दिग्विजय सूर्यवंशी, आमदार सुधीर गाडगीळ, सुरेश खाडे, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील. राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पाटील, प्रमुख उपस्थित होते. अध्यक्ष रावसाहेब पाटील यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री पवार व प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला.

पवार म्हणाले, नागरी सहकारी बँकेतील एक लाखांपर्यंतच्या ठेवींना विमा संरक्षण होते. रिझर्व्ह बँकेने मध्यंतरी 5 लाखांपर्यंतच्या ठेवींना विमा संरक्षण लागू केले. पतसंस्थांमधील ठेवींनाही विमा संरक्षणाची गरज आहे. किती ठेवींना संरक्षण द्यायचे, कसा मार्ग काढायचा याबाबतचे धोरण राज्य सरकार लवकरच ठरवेल. त्यासाठी सहकार मंत्री यांच्यासह यंत्रणेची बैठक घेऊ. पवार म्हणाले, राष्ट्रीयकृत बँकांतून बडे भांडवलदार कर्जे काढतात. कर्ज थकवतात, बुडवतात. एक रकमी परतफेडीतून 50 टक्के माफी घेतात आणि सर्वसामान्य कर्जदारांची भांडीकुंडीही जप्त करून घेऊन जातात. कर्जाच्या सेटलमेंटचे धोरण गल्ली ते दिल्ली एकसारखे पाहिजे. सर्वसामान्य माणूस ते बडा उद्योजक धोरण एकच पाहिजे.

46 हजार सभासद; तरीही बिनविरोध पतसंस्थांचे संचालक कोण यावर ठेवी जमतात. कर्मवीर पतसंस्थेमध्ये डॉक्टर, वकील, व्यावसायिक आहेत. त्यांच्या सचोटीकडे पाहून ठेवी जमल्यात. संस्थेचे आर्थिक मापदंड उत्कृष्ट आहेत. नफा चांगला आहे. मुख्यालय उद्घाटनाच्या निमित्ताने दिलेला 18 टक्के लाभांशही चांगला आहे. 46 हजार सभासद आणि संस्थेची निवडणूक बिनविरोध हे कौतुकास्पदच आहे. पण भविष्यात इमारत पाहून निवडणुकीत गर्दीची शक्यता असल्याची मार्मिक टिपन्नीही त्यांनी केली. जुन्या जाणत्या संचालकांबरोबर तरुणांनाही पतसंस्थेचे संचालक म्हणून कारभारात संधी द्या, असे आवाहन केले.

डॉ. कदम म्हणाले, सहकार क्षेत्रासमोर खूप मोठी आव्हाने आहेत. कोरोनाचाही परिणाम सर्व क्षेत्रावर झाला. तरीही सर्वांवर मात करून कर्मवीर भाऊराव पाटील सहकारी पतसंस्थेने प्रगती साधली आहे. संचालक मंडळाच्या त्याग व पारदर्शी कामामुळे हे साध्य झाले आहे. 1987 साली लावलेले रोपटे आज वटवृक्षात रुपांतरीत झाले आहे. तळागाळातील कष्टकरी जनतेला सक्षम केले आहे.

पतसंस्थेचे अध्यक्ष रावसाहेब पाटील म्हणाले, लहानशा खोलीतून पतसंस्थेची सुरूवात झाली. विश्वासार्हता, पारदर्शी कारभारामुळे हा पतसंस्थेचे वटवृक्षात रुपांतर झाले आहे. पतसंस्थेच्या 51 शाखा आहेत. नव्याने 10 शाखा सुरू होत आहेत. 20 कोटींचा नफा झाला आहे. बँकींगच्या सर्व आधुनिक सेवा दिल्या जात आहेत. मुख्यालय इमारत 13 कोटींची आहे. प्रगतीची घोडदौड नेटाने चालू राहील. कर्मवीर पतसंस्था मुख्यालय वास्तु अतिशय देखणी उभारल्याबद्दल वास्तुविशारद प्रकाश जाधव यांचा पवार यांच्या हस्ते सत्कार केला. पतसंस्थेच्या उपाध्यक्ष डॉ. भारती चोपडे, संचालक अ‍ॅड. एस. पी. मगदूम, डॉ. नरेंद्र खाडे, डॉ. रमेश ढबू, लालासाहेब थोटे, ए. के. चौगुले, वसंतराव नवले, ललिता सकळे, आप्पासाहेब गवळी, बजरंग माळी, महेश संत, डॉ. एस. बी. पाटील, गुळाप्पा शिरगिरे, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल मगदूम उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news