ई-पासपोर्ट आहे तरी काय? | पुढारी

ई-पासपोर्ट आहे तरी काय?

सध्या जगातील 150 पेक्षा अधिक देशांनी आपल्या नागरिकांसाठी ई-पासपोर्टची सुविधा आणली आहे. 1998 रोजी बायोमेट्रिक पासपोर्ट जारी करणारा पहिला देश मलेशिया होता. त्यानंतर टप्प्याटप्प्याने अन्य देशांनी ही सुविधा स्वीकारली आणि अंगीकारली. भारतानेदेखील आपल्या नागरिकांना डिजिटल पासपोर्ट देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

ई-पासपोर्ट म्हणजे काय?

ई-पासपोर्टचे स्वरूप कसे असते? ते कसे काम करते? ई-पासपोर्टची गरज का पडली? ई-पासपोर्ट असण्याचे काय फायदे असतात? ई-पासपोर्ट कसे तयार करावे? जगात ई-पासपोर्ट जारी करणारा पहिला कोणता देश आहे? असे असंख्य प्रश्न आपल्या मनात निर्माण झाले असतील. एका एका प्रश्नाचे उत्तर आपण शोधू.

ई-पासपोर्ट कसा असतो?

ई-पासपोर्टचे पूर्ण नाव इलेक्ट्रॉनिक पासपोर्ट आहे. त्यास डिजिटल पासपोर्ट, बायोमेट्रिक पासपोर्ट किंवा पासपोर्ट ई-चीप नावानेदेखील ओळखले जाते.

त्याला आपण थोडक्यात ई-पासपोर्ट म्हणतो. ई-पासपोर्ट हा एक इलेक्ट्रॉनिक पासपोर्ट असतो. त्यात चीप असते आणि त्या चीपमध्ये एका व्यक्तीचा फोटो, फिंगरप्रिंट आणि आयरिस स्कॅन करून त्याचे स्टोअर केले जाते. चीपमध्ये व्यक्तीचे संपूर्ण विवरण असते. फोटो, पत्ता, सही, पासपोर्ट नंबर, राष्ट्रीयता आणि नागरिकत्व याचे संपूर्ण विवरण असते. ज्याप्रमाणे भारतात डिजिटल रूपात आधार कार्ड मिळते, त्याचप्रमाणे आता ई-पासपोर्टदेखील डिजिटल मिळेल. ई-पासपोर्टचे फ्रंट पेज म्हणजे ज्या ठिकाणी अशोकचक्र असते, त्याखाली चीप बसवलेली असेल. या चीपचे वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या आत 64 केबीपर्यंत डेटा स्टोअर केला जातो. ई-पासपोर्ट हा आयआयटी कानपूर, राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्र, भारतीय प्रेस आणि परराष्ट्र मंत्रालयाने विकसित केला आहे.

ई-पासपोर्ट कसे काम करते?

परदेशात प्रवास करताना विमानतळावर इमिग्रेशन काऊंटरवर पासपोर्टवर असलेल्या चीपला टच करावे लागते. चीपमधील माहिती सेन्सरच्या मदतीने स्कॅन केली जाते. यात आपण कोणत्या देशात जाण्यासाठी आला आहात, कोणत्या उद्देशाने परदेशात जात आहेत, याची इंत्यभूत माहिती असते. त्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे वेळ वाचेल. इमिग्रेशन काऊंटरवर डिजिटल पासपोर्ट दाखवताच आपली संपूर्ण माहिती उपलब्ध होईल आणि त्यासाठी काऊंटरवर फार काळ ताटकळत उभे राहवे लागणार नाही.

ई-पासपोर्टची गरज कशासाठी?

एखाद्या व्यक्तीचा फिजिकल पासपोर्ट हरवला तर काही समाजकंटक मंडळी त्याचा दुरुपयोग करू शकतात. त्यात दुरुस्ती करून बेकायदा कामासाठी त्या पासपोर्टचा वापर केला जाऊ शकतो. परंतु ई-पासपोर्टमध्ये असे काही करता येत नाही.

कारण तो एक डिजिटल पासपोर्ट असतो. यात चीप असते आणि त्यात माहिती स्टोअर केलेली असते. एखाद्या कारणामुळे एखादा व्यक्ती चीप काढण्याचा प्रयत्न करत असेल, तर ती खराब होऊ शकते. पारपत्र कार्यालयात तो पासपोर्ट स्कॅन केल्यानंतर एरर दाखवते. यानुसार या पासपोर्टमध्ये काहीतरी गडबड करण्याचा प्रयत्न केला आहे, हे सिद्ध होते.

ई-पासपोर्टचे फायदे

* ई-पासपोर्ट असल्याने आपले इमिग्रेशन लवकर होईल. त्याचबरोबर लोकांना रांगेत उभे राहण्याची गरज भासणार नाही. * साध्या पासपोर्टच्या तुलनेत डिजिटल पासपोर्टचा कोणत्याही मार्गाने दुरुपयोग होेत नाही. * देशात बनावट आणि खोटे पासपोर्ट बंद होतील. * ई-पासपोर्टमध्ये चीप असते आणि त्यात संबंधित व्यक्तीची माहिती डिजिटल स्वरूपात सेव्ह राहते. * ई-पासपोर्टमधील माहिती ही कोणत्याही स्थितीत डिलिट होऊ शकत नाही.

ई-पासपोर्ट तयार कसे करावे?

सध्याच्या काळात ई-पासपोर्ट तयार करण्याचे काम टीसीएसला देण्यात आले आहे. ई-पासपोटसाठी अर्ज केल्यानंतर काही दिवसांनी ई-पासपोर्ट तयार होईल. 10 जानेवारी 2022 पासून आलेल्या अर्जावर काम सुरू झाले असून, त्यानुसार ई-पासपोर्ट तयार केले जाईल. आजघडीला ई-पासपोर्ट ऑनलाईनवर उपलब्ध करण्याची प्रक्रिया सुरू झालेली नाही.

विधिषा देशपांडे

Back to top button