पुणे : नारायणगाव खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी जेरबंद | पुढारी

पुणे : नारायणगाव खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी जेरबंद

नारायणगाव (पुणे); पुढारी वृत्तसेवा : नारायणगाव याठिकाणी मीना नदीजवळील हरिहरेश्वर मंदिराजवळ झालेल्या खुनाचा जलद गतीने तपास करून स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व नारायणगाव पोलिसांनी आरोपीला पकडल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिली. पिंटू ऊर्फ रामदास तुकाराम पवार (रा. वैष्णवधाम, सध्या नारायणगाव) असे पोलिसांनी पकडलेल्या आरोपीचे नाव आहे. तो हरिहरेश्वर मंदिरात दिवाबत्ती करण्याचे काम करत होता.

संभाजी ऊर्फ गोविंद बबन गायकवाड (रा. येणेरे) यांचा शुक्रवारी (दि. १३) हरिहरेश्वर मंदिरासमोरील मोकळ्या शेतात खून करून त्यावर चादर टाकून आरोपी फरार झाला होता. याबाबतची फिर्याद त्याचा भाऊ तानाजी गायकवाड यांनी नारायणगाव पोलिस ठाण्यात दिली होती. आरोपीचा शोध घेणे हे पोलिसांसाठी आव्हान होते. गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने आरोपींना तात्काळ अटक करण्याच्या सूचना पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला दिल्या होत्या.

त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक शेळके व नारायणगावचे सहायक पोलिस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दोन पथके तयार करून तपासकामी रवाना केले. गोपनीय बातमीदारामार्फत पोलिसांना आरोपी हा जुन्नरच्या पश्चिम पट्ट्यात वरसावनेच्या डोंगरांमध्ये लपून बसला आहे, अशी माहिती मिळाली. त्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील पोलिस उपनिरीक्षक गणेश जगदाळे, पोलिस हवालदार दीपक साबळे, राजू मोमीन, पोलिस नाईक संदीप वारे, पोलिस जवान अक्षय नवले, नीलेश सुपेकर यांनी वरसावनेच्या डोंगरात जाऊन त्याचा शोध सुरू केला. रात्रीच्या वेळी १० ते १२ किलोमीटर डोंगरात शोध घेत असताना संशयित पिंटू पोलिसांची चाहूल लागल्याने निघून गेला. दुसऱ्या दिवशी आरोपी हा घोडेगाव भीमाशंकर येथे जंगलात गेल्याची माहिती मिळाल्याने तेथील स्मशानभूमीतून त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याने खून केल्याची कबुली दिली. तपास नारायणगाव पोलिस करीत आहेत.

Back to top button