नाशिक : फांगदर शाळेतील पक्षिमित्रांचा घर तिथे पाणवठा उपक्रम

देवळा : फांगदर प्राथमिक शाळेतील पक्षिमित्र विद्यार्थी.
देवळा : फांगदर प्राथमिक शाळेतील पक्षिमित्र विद्यार्थी.

नाशिक (देवळा/खामखेडा) : पुढारी वृत्तसेवा : सध्या उष्णतेची लाट आली असून, तापमान दिवसेंदिवस 40 अंश सेल्सिअसच्या पुढे सरकत आहे. याचा फटका पक्ष्यांनादेखील बसत आहे. शेत शिवारातील तसेच डोंगरमाथा परिसरातील पाण्याचे स्रोत आटल्याने उन्हाच्या कडाक्यामुळे पक्षी गतप्राण होऊ नये, यासाठी फांगदर (खामखेडा) प्राथमिक शाळेचे विद्यार्थी पुढे सरसावले. त्यांनी शाळेच्या परिसरासोबतच 'घर तिथे पाणवठा' हा उपक्रम सुरू केला आहे.

यावर्षी उन्हाचा पारा 40 अंशांवर गेला आहे. उन्हाचा फटका मनुष्याबरोबरच पक्ष्यांनाही बसत आहे. पक्ष्यांना आपल्या परिसरात पाणी मिळावे, म्हणून फांगदर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील पक्षीमित्रांनी ठिकठिकाणी कृत्रिम पाणवठे तयार केले आहेत. शाळा काही वर्षांपासून पक्ष्यांसाठी पाणवठे तयार करीत आहे. त्यातून शाळेच्या परिसरात पक्ष्यांसाठी पाण्याची सुविधा झाल्याने चिमण्या, साळुंकी, कावळा, बुलबुल, कोकीळ, पारवे यासारखे पक्षी दिसू लागले आहेत. रिकाम्या बाटल्या वापरून त्यातून पाणी पिता येईल, अशा पद्धतीने आडव्या कापून झाडांच्या सावलीत टांगल्या आहेत. तीन ते चार ठिकाणी बाजरी, तांदूळ धान्याचीदेखील व्यवस्था केली आहे. मुख्याध्यापक संजय गुंजाळ, शिक्षक खंडू मोरे यांनी विद्यार्थ्यांच्या मदतीने हा उपक्रम राबविला. शाळेने सुरू केलेल्या या अभिनव उपक्रमाचे गटशिक्षण अधिकारी सतीश बच्छाव, शिक्षण विस्ताराधिकारी किरण विसावे, नंदू देवरे, केंद्रप्रमुख गंगाधर लोंढे यांच्यासह पालकांनी कौतुक केले आहे.

फांगदर शाळेने पक्ष्यांसाठी कृत्रिम पाणवठा तयार करत विद्यार्थ्यांमध्ये भूतदयेचा संस्कार रुजवण्यासाठी केलेल्या उपक्रमाचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. पक्षी संवर्धन गरजेचे आहे. – किरण विसावे, शिक्षण विस्तार अधिकारी.

औषधांच्या रिकाम्या बाटल्या स्वच्छ धुवत अर्ध्यावर कापत त्या झाडांना टांगल्या आहेत. रोज सकाळी या बाटल्यांमध्ये आम्ही पाणी भरतो. या ठिकाणी पक्षी पाणी पीत असल्याचे समाधान खूप मोठे आहे. – क्रांती मोरे, विद्यार्थिनी.

अनेक विद्यार्थी तीन किमी अंतरावरून शाळेत येतात. या रस्त्याने असलेल्या झाडांनादेखील पाणवठे बसवले आहेत. विद्यार्थी आपले प्यायचे पाणी शाळेतून जाताना राखून ठेवतात व या ठिकाणी टाकतात. – संजय गुंजाळ, मुख्याध्यापक

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news