नाशिक शहरात ‘या’ कारणास्तव उद्या वाहतूक मार्गांत बदल | पुढारी

नाशिक शहरात 'या' कारणास्तव उद्या वाहतूक मार्गांत बदल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
हनुमान जयंतीनिमित्त शनिवारी (दि.16) चौक मंडई ते रामकुंड या पारंपारिक मार्गावर मिरवणूक निघणार आहे. या मार्गावर वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी शहर पोलिस दलातर्फे वाहतूक मार्गांत बदल करण्यात आले आहेत.
जुन्या नाशिकमधील चौक मंडई येथील वझरे मारुती मंदिरापासून मिरवणूक निघणार आहे. दूधबाजार, गाडगे महाराज पुतळा, मेनरोेड, रेडक्रॉस सिग्नल, महात्मा गांधी रोड, अशोकस्तंभ, रविवार कारंजा, मालेगाव स्टॅण्ड ते रामकुंड असा मिरवणुकीचा मार्ग असेल. वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून दुपारी 3 पासून ते मिरवणूक संपेपर्यंत सर्व वाहनांसाठी हा मार्ग बंद करण्यात आला आहे.

या मार्गावरील वाहनांना पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यानुसार जुन्या नाशिकमधून वाहने बागवानपुरा पोलिस चौकी ते अमरधाम रोड ते पंचवटी याप्रमाणे जातील. द्वारका, दूधबाजारमार्गे पंचवटीकडे जाणारी वाहने सारडा सर्कल ते खडकाळी सिग्नल, मोडक सिग्नल, शालिमार, सीबीएस, कॅनडा कॉर्नर, जुना गंगापूर नाकामार्गे चोपडा लॉन्सकडून पंचवटीकडे मार्गक्रमण करतील. पंचवटी कारंजाकडून येणारी वाहतूक मखमलाबाद नाका, चोपडा लॉन्स, जुना गंगापूर नाकामार्गे पुढे जातील. तर सीबीएसकडून पंचवटीकडे जाणारी वाहतूक मेहेर सिग्नल, अशोकस्तंभ, गुरांचा दवाखाना, घारपुरे घाट, रामवाडी पूलमार्गे पुढे मखमलाबाद नाकामार्गे पंचवटी जातील.

.. तर कारवाई करणार
पोलिसांच्या वाहनांसह रुग्णवाहिका, शववाहिका, अग्निशमन दल तसेच अत्यावश्यक व आपत्कालीन सेवेतील वाहनांसाठी हे आदेश लागू राहणार नाहीत. या आदेशाचे उल्लंघन करणार्‍या इतर चालकांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिस दलातर्फे देण्यात आला आहे.

हेही वाचा :

Back to top button