Talathi Job Scam: तलाठी नोकरीसाठी 26 लाखांचा गंडा; खात्रीशीर नोकरीच्या आमिषाने दोघांची फसवणूक
पाथर्डी : तालुक्यात ‘तलाठी पदाची खात्रीशीर नोकरी’ मिळवून देण्याचे आमिष दाखवून तब्बल 26 लाखांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी खांडगाव येथील सुरेश कोंडीराम पवार यांनी पाथर्डी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी सुरेश पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचा मुलगा शेखर तसेच गावातील दिनकर मगर यांनी सप्टेंबर 2023 मध्ये तलाठी पदासाठी अर्ज भरला होता. याच दरम्यान लोहसर येथील राजेंद्र जगन्नाथ दगडखैर यांनी ‘माझा नातेवाईक महसूल विभागात मोठा प्रभावशाली आहे,’ असा दावा करून नामदेव रामराव मिसाळ (रा. खोकरमोहा, ता. शिरूर, जि. बीड) याची ओळख करून दिली.
ऑगस्ट 2023 मध्ये खांडगाव येथे झालेल्या बैठकीत नामदेव मिसाळ यांनी प्रत्येकी 15 लाख रुपये घेतल्यास मुलांना तलाठी पदावर नक्की नियुक्ती मिळवून देऊ, असे आश्वासन दिले. दगडखैर यांनीही तुमचे पैसे मी स्वतः जबाबदारीने परत करीन, असे हमी दिल्याने पवार व दत्तात्रय मगर यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला.
दिनांक 8 सप्टेंबर 2023 रोजी पाडळसिंगी येथील सनराईज हॉटेलमध्ये दोघांना प्रत्येकी 10 लाख (एकूण 20 लाख) रुपये देण्यात आले. त्या वेळी मिसाळ यांनी पाच-पाच लाखांचे दोन हमीचे धनादेश दिले. त्यानंतर मार्च 2024 मध्ये दगडखैर यांनी कामासाठी आणखी पैसे द्यावे लागतील, असे सांगत प्रत्येकी 3 लाखांची (एकूण 6 लाख) मागणी केली.
ही रक्कमही पवार व मगर यांनी त्यांच्याकडे सुपूर्द केली. दरम्यान, तलाठी भरती प्रक्रिया पूर्ण झाली; परंतु दोन्ही युवकांची नियुक्ती झाली नाही. पवार परिवाराने अनेकदा मागणी करूनही दोघेही ‘काम होईल. पुढच्या जाहिरातीमध्ये नक्की सेटिंग लावली आहे’ असे सांगून टाळाटाळ करत राहिले.
शेवटी 26 लाख रुपये न परत करता, खोटी नोकरीची आश्वासने देत फसवणूक केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पवार यांनी पोलिसांत धाव घेतली. या प्रकरणी नामदेव रामराव मिसाळ व राजेंद्र जगन्नाथ दगडखैर यांच्याविरोधात फसवणूक व विश्वासघाताचे गुन्हे दाखल करण्यात आले.

