

नगर : वाढत्या जंगलतोडीमुळे नष्ट होणाऱ्या जैवविविधतेचे संरक्षण व्हावे, स्वच्छ हवा मिळावी, पक्षी, फुलपाखरे आणि इतर जीवांसाठी नैसर्गिक अधिवास निर्माण व्हावा, ग्लोबल वार्मिंग कमी व्हावे, लोकांना झाडाचे आणि पर्यावरणाचे महत्व समजावे, इत्यादी हेतू डोळ्यांसमोर ठेवून जिल्ह्यातील गावोगावी मिनी जंगल निर्मिती करण्यासाठी जिल्हा परिषदेची यशस्वी घोडदौड सुरू आहे. जिल्ह्यात 969 हेक्टरवर साडेआठ लाख वृक्षांची लागवड करण्यात आली असून, राज्यात अहिल्यानगर पहिल्या स्थानी आहे.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाला जुलै 2025 मध्ये मंजुरी देण्यात आली होती. तेव्हापासूनच, जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यात त्या दिशेने नियोजन सुरू झाले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी सप्टेंबरनंतर या अभियानाला खऱ्याअर्थाने सुरुवात केल्याचे दिसले. या अभियानाचा एक भाग असलेल्या वृक्षलागवडीत नगर कुठेही मागे राहिलेले नाही.
जिल्ह्यात मियावाकी वृक्ष लागवड अभियानातून एका गुंठ्यात तीनशे झाडे लावली जात आहे. 276 ठिकाणी 969 गुंठ्यांवर 2 लाख 97 हजार 650 वेगवेगळी झाडे लावण्यात आली आहेत. तसेच ‘नरेगा’ अंत्तर्गत 19 हजार 284 झाडांची लागवड करण्यात आली आहे. खासगी क्षेत्रावर फळबाग, तुती इत्यादी प्रकारे 1 लाख 58 हजार वृक्षांचे रोपन केले गेले. अंगणवाडी, शाळांच्या परिसरात 1 लाख 23 हजार 669 वृक्ष लागवड केली. 1 लाख 23 हजार झाडांच्या माध्यमातून घराच्या अंगणातही परसबाग उभी राहिली आहे. याशिवाय ग्रामपंचायत हद्दीतही वृक्षलागवड झालेली आहे. अशी जिल्ह्यात साडेआठ लाख झाडी लावली आहेत. तीन वर्षांमध्ये याचे मिनी जंगलात रुपांतर होणार आहे.
जिल्ह्यात लावलेल्या झाडांची अमृतवृक्ष ॲपवर नोंद करण्यात आली आहे. तसेच प्रत्येक झाडाचे 100 टक्के जिओ टॅगींग करण्यात आले आहे. सीईओ स्वतः याचा गावनिहाय नोडल अधिकारी असलेले सुधीर शिंदे यांच्याकडून दर महिन्याला आढावा घेत आहेत.
ग्रामपंचायतीच्या जागेवर 34 हजार 932 व्यवसायिक वृक्ष लागवड करण्यात आली आहे. यात आंबा, चिंच इत्यादी वृक्षांचा समावेश आहे. या झाडांच्या माध्यमातून ग्रामपंचायतींना भविष्यात उत्पन्नही मिळणार आहे. त्यामुळे या झाडांचे संवर्धन करण्यासाठी ग्रामपंचायतही विशेष काळजी घेताना दिसत आहेत.
जिल्ह्यात सीईओंच्या मार्गदर्शनात साडेआठ लाख वृक्षलागवड करण्यात आली आहे. या माध्यमातून मिनी जंगल उभे राहणार आहेत. यातून जैवविविधतेचे संरक्षणासोबतच पर्यावरण संवर्धनासाठी ही वृक्षलागवड महत्वपूर्ण ठरणारी आहे. ग्रामस्थांना, विशेषतः विद्यार्थ्यांनाही जंगलाचे, झाडांचे महत्व समजेल. झाडांची काळजी घेतली जात आहे.
सुधीर शिंदे, नोडल अधिकारी, मियावाकी वृक्षलागवड