

पाथर्डी: नगरपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेवगाव-पाथर्डी मतदारसंघातील भाजप अंतर्गत वाद चिघळला आहे. शेवगाव नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत बंडखोरी करणारे भाजपचे प्रदेश चिटणीस अरुण मुंडे यांची पक्षातून हकालपट्टी करा, अशी मागणी प्रमुख पदाधिकाऱ्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
भाजपचे पाथर्डी तालुका मंडळाध्यक्ष धनंजय बडे, जिल्हा युवामोर्चा अध्यक्ष सचिन वायकर, कोरडगाव मंडळाध्यक्ष दिगंबर भवार, शेवगाव मंडलाध्यक्ष संजय टाकळकर, महिला मोर्चाच्या विद्या आधाट, शेवगाव शहराध्यक्ष राहुल बंब, शेवगाव मंडळाध्यक्ष महेश फलके, महिला मोर्चाच्या दीपाली काथवटे, व्यापारी आघाडीचे राजभाऊ लड्डा, अध्यत्मिक आघाडीचे शेखर मुरदारे यांनी गुरुवारी भाजप जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांच्याकडे मागण्यांचे निवेदन दिले.
या निवेदनात म्हटले की,गेल्या विधानसभेला मुंडे यांनी तुतारीचा प्रचार होता. आमदार मोनिका राजळे यांनी मंजूर केलेल्या विकास कामांमध्ये विरोधकांना सोबत घेऊन खोडा घालण्याचे काम ते करतात. पक्षकाडून पदे घ्यायची व त्या पदाचा वापर ठेकेदाराची कामे मिळवणे, वाळूधंदा व अवैध जमीन व्यवहार स्वतःचा आर्थिक लाभ करून घेतात.
लोकप्रतिनिधी व पक्षश्रेष्ठींंच्या विरोधात आरोप करीत बेताल वक्तव्ये ते करीत असतात. शेवगाव पालिका निवडणुकीत उभे राहिलेल्या भाजप उमेदवारांना ते दमदाटी करतात. मागील विधानसभेला त्यांची पक्षातून हकालपट्टी करा, अशी मागणी केली होती. मात्र, कार्यवाही झाली नाही.
..तर जनतेत वेगळा संदेश
मुंडे यांची भाजपमधून हकोलपट्टी केले नाही, तर जनतेत वेगळा संदेश जाईल. त्यामुळे तातडीने मुंडे यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी केली आहे.