

पुणतांबा: दौंड-मनमाड रेल्वेमार्गावरील रेल्वे फाटक बंद करून भुयारी मार्ग करण्याचे काम सध्या रेल्वे विभागाकडून वर्षभरापूर्वीच पूर्ण झालेले आहे. मात्र पुणतांबे येथे उड्डाण पूल की भुयारी मार्ग होणार, याबाबत निर्णय नसल्याने दैनंदिन वाहन चालकासह ग्रामस्थांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
कोपरगाव, श्रीरामपूर व्हाया पुणतांबे येथे राज्यमार्गावर रेल्वे फाटक येत आहे. या रस्त्यावरील वाहतुकीची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तसेच दौंड-मनमाड रेल्वेमार्गावर दुहेरी मार्गाचे काम पूर्ण झाले असून त्यामुळे रेल्वेगाड्यांची संख्या वाढली असल्याने रेल्वे फाटक वारंवार बंद राहते. त्यामुळे वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात.
पूर्वीचे रेल्वे फाटक बंद करून पुढे पश्चिमेकडे साधारण तीनशे मीटर अंतरावर नवीन रेल्वे फाटक झाले आहे. या ठिकाणी कोपरगाव, श्रीरामपूर रस्त्याबरोबरच चांगदेव मंदिर व मातुलठाणकडे जाणारा रस्ता असल्याने फाटक बंद आणि उघडल्यानंतर वाहतुकीचा मोठा खोळंबा होतो. त्यामुळे वाहनधारकांना विलंबाने मोठा मनस्ताप सहन करावा लागतो.
सध्या रेल्वे प्रशासनाकडून वारंवार या गेटचे काम करीत असल्याने त्यामुळे हे अनेकदा गेट बंद असते. यामुळे मोठा वारसा घेऊन वाहन चालकासह ग्रामस्थांना जावे लागते. या ठिकाणी उड्डाण पूल होणार म्हणून रेल्वे, तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याचे मोजमाप केले आहे. मात्र निर्णय अजुनही झालेला नसल्याने प्रवाशांमधून नाराजी आहे.
पुढील वर्षी पुन्हा रेल रोको आंदोलन?
येथे भुयारी मार्ग की उड्डाणपूल हा प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असल्याने नागरिकांना व वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून हा प्रश्न तातडीने मार्गी लावावा यासाठी येत्या 26 जानेवारी रोजी पुन्हा रेल रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचे प्रथम लोकनियुक्त सरपंच धनंजय धनवटे यांनी सांगितले.