

नगर: अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस मिळून शहरात चांगला पर्याय देणार आहोत. महायुतीमधील आणखी कोणी बरोबर येत असल्यास त्यांचे स्वागतच करु. मात्र, येणाऱ्या तिसऱ्या घटक पक्षातील कोणाबरोबर चर्चा करावी हा संभ्रम आहे. त्यामुळे त्या पक्षाच्या नेत्यांनी समन्वय साधण्यासाठी एक नेतृत्व निश्चित करावे जणेकरुन त्यांच्याशी निवडणुकीबाबत चर्चा करणे सोपे होईल, अशी भूमिका माजी खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी शनिवारी व्यक्त केली. (Latest Ahilyanagar News)
अहिल्यानगर शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालयात डॉ. सुजय विखे पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी आमदार संग्राम जगताप, भाजप शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते उपस्थित होते. माजी खासदार डॉ. विखे पाटील म्हणाले की, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या तीनही पक्षांच्या वतीने महायुती म्हणून लढविण्याचे प्रयत्न सुरु आहेत. स्वबळाची भाषा करणारे पुन्हा महायुतीत येण्यासाठी धडपड करण्याची शक्यता आहे. अहिल्यानगर महापालिकेसाठी शहरात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रितपणे लढणार आहे.
आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली नगर शहरात चांगला पर्याय देण्याचा मानस आहे. खासदारकीच्या काळात शहरातील विकासकामे करताना आमदार जगताप यांची साथ मिळाली. आमदार जगताप यांना पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची साथ मिळत आहे. आम्ही दोघे परिवार म्हणून एकत्र आलो तर अहिल्यानगर शहराचा अधिक विकास होणार आहे. यामध्ये आमचा दोघांचाही स्वार्थ नसल्याचे डॉ. विखे पाटील यांनी नमूद केले. महपौर, सभापती कोणाचा या स्पर्धेत आम्ही पडलो नसल्याचेही विखे पाटील यांनी स्पष्ट केले.
नगर शहरात एकत्रितपणे लढविल्यास 30 टक्के ठिकाणी मतभेद होण्याची शक्यता आहे. मात्र, मी आणि आमदार जगताप आम्ही सक्षम आहोत. भाजप वरिष्ठ नेते तसेच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यावर तोडगा काढतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
महायुतीमधील शहरात भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात समन्वय होऊ शकतो. मग महायुतीमधील शिवसेना (शिंदे गट) या तिसऱ्या घटक पक्षाशी समन्वय होऊ शकत नाही का याकडे विखे पाटील यांचे लक्ष वेधले असताना ते म्हणाले की, ते आल्यास आम्ही मदतीचाच हात पुढे करु. मात्र, अहिल्यानगर येथील नव्हे मात्र, श्रीरामपूर तालुक्यात शिवसेना या घटक पक्षातील कोणत्या स्थानिक नेत्याशी चर्चा करावी असा संभ्रम आहे. एकाशी चर्चा केली तर दुसऱ्याला ते मान्य होईल असे वाटत नाही. त्यामुळे चर्चा कशी करावी हा प्रश्न आहे. त्यामुळे वरिष्ठ नेत्यांनीच त्यांचे एक नेतृत्व निश्चित करावे. त्यांना अधिकार द्यावा जेणेकरुन त्यांच्याशी चर्चा करणे वा आक्षेप नोंदविणेे आम्हाला सोपे जाईल. यासाठी महायुतीमधील सर्वच घटक पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी समन्वय साधण्यासाठी नेते नियुक्त करावेत अशी मागणी माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी केली.
दरम्यान, लोकसभा व विधानसभा निवडणुकीत आमच्या विरोधात काम केलेले काही नेते महायुतीच्या घटक पक्षात दाखल झाले असले तरी त्यापैकी कोणी मला भेटले नाहीत. वा माझ्या संपर्कात देखील नाहीत. त्यामुळे ते कोणत्या पक्षात जातात याच्याशी मला काही देणे घेणे नसल्याचे त्यांनी म्हटले.सांगितले. निवडून आले तर ईव्हीएम चांगले आहे. पराभूत झाले तर ईव्हीएममध्येच काहीतरी घोठाळा आहे अशी ओरड विरोधकांकडून होत आहे. नगर शहरात मध्यंतरी दोन बांग्लादेशी आढळले. त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल झाला. परंतु यामध्ये अधिक चौकशीची आवश्यकता होती. त्यांची नावे तपासणे गरजेचे होते. असे त्यांनी यावेळी म्हटले.
हिंदुत्व हित माझे कर्तव्यच : आ. जगताप
आमदार संग्राम जगताप म्हणाले की, पक्षाशी विचारधारा महत्त्वाचीच आहे. मतदारांनी टाकलेली जबाबदारी सांभाळणे देखील महत्त्वाचे आहे. हिंदूत्त्वाचे रक्षण करणे हे माझे स्वत:चे कर्तव्य आहे. त्यामुळे जबाबदारीबरोबरच कर्तव्य देखील पार पाडणार असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
काँग्रेसमधील कोणालाही एन्ट्री नाही
सक्षम असेल, पाठीशी जनमत असेल अशा पदाधिकारी वा कार्यकर्त्यांना भाजपात घेणे वावगे नाही. तुमचे काम हीच तुमची ओळख असेल अशा चांगल्या नेत्यांचे महायुतीतमध्ये स्वागतच केले जाणार आहे. जिल्ह्यातील काही मोठे नेते देखील लवकरच प्रवेश करणार आहेत. मात्र, याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच घेणार आहेत. त्यामुळे कोण येणार ही नावे मी सांगू शकत नसल्याचे डॉ. विखे यांनी म्हटले. ‘ऑपरेशन लोटस’चे फक्त शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हेच टार्गेट नाही. उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनामधील काही नेते असू शकतात. काँग्रेस हा संपत आलेला पक्ष आहे. त्या पक्षातील कोणा नेत्यांना वा पदाधिकाऱ्यांना एन्ट्री मिळणार नसल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.