

कोपरगाव: शाळेसमोर अथवा पटांगणात दारू पिऊन बाटल्या टाकणारे भरकटलेले काही तरुण एकिकडे तर, त्याच शाळेसमोर दररोज न चुकता नतमस्तक होत पाणी घालणारे 87 वर्षिय वामन ठाणगे बाबा दुसरीकडे असा विरोधाभास दिसत आहे. (Latest Ahilyanagar News)
दरम्यान, या दोन्ही दृश्यांमधून दोन पिढ्यांमधील विचारांचा फरक स्पष्ट होत आहे. कोपरगाव तालुक्यातील दक्षिणगंगा गोदावरी नदी तिरावर कुंभारी हे वामन ठाणगे यांचे गाव आहे. ठाणगे बाबा स्वतः शिक्षण घेऊ शकले नाही, पण शिक्षणाबद्दल त्यांना असलेले प्रेम, ओढ व श्रद्धा यामुळे त्यांनी संपूर्ण आयुष्य शिक्षण प्रसाराला वाहिले आहे. माजी खासदार स्व. शंकरराव काळे यांचे मार्गदर्शन व ग्रामस्थांच्या सहकार्यातून ‘रयत’चे गुरुवर्य तुकाराम बाबा विद्यालय उभारण्यात ठाणगे बाबा यांचे मोलाचे योगदान आहे.
या शाळेतून असंख्य विद्यार्थी घडले. काही परदेशात स्थायिक झाले, तर काहींनी समाजात नावलौकिक मिळवला. या यशामागे ठाणगे बाबांची शिक्षणसेवा व दृढ निष्ठा आहे, असे ग्रामस्थ भावपूर्ण सांगतात. आजही ठाणगे बाबा दररोज मंदिरात जाण्यापूर्वी शाळेच्या प्रवेशद्वारासमोर थांबतात. नतमस्तक होतात व त्या पवित्र भूमीवर पाणी घालतात. हे अनोखे दृश्य पाहताना श्रद्धा, सबुरी व शिक्षणप्रेमाचा अनोखा संगम अनुभवास येतो.