

धानोरे : राहुरी तालुक्यातील धानोरे गावात रमेश दिघे यांच्या चणेगाव शिवानजीक असणाऱ्या शेतात वन विभागाने एका जखमी बिबट्यास भूल देऊन जेरबंद केले. (Latest Ahilyanagar News)
शुक्रवारी सकाळी रमेश दिघे हे त्यांच्या शेतातील गिनी गवत आणण्यासाठी गेले होते. त्यावेळी बिबट्या दबा धरून बसला होता. तो हल्ला करण्याच्या तयारीत असताना, रमेश दिघे यांनी त्याला पाहिले. बिबट्या समोर पाहताच त्यांचा थरकाप उडाला. त्यांनी चारा तिथेच टाकून शेताबाहेर धूम ठोकली. बिबट्या... बिबट्या.. असा आरडाओरडा केला. काहीवेळात चार ते पाच शेतकरी त्या ठिकाणी धावत आले. त्यावेळीही बिबट्या एकाच जागेवर बसून होता. मात्र, तो धडपडत असल्याचे लक्षात आले. हा बिबट्या जखमी असल्याचे दिसले.
शेतकऱ्यांनी तत्काळ वन्यजीव प्राणीमित्र विकास म्हस्के यांना माहिती दिली. त्यांनी अहिल्यानगरचे उपवन संरक्षक धर्मवीर सालविठ्ठल, सहाय्यक उपवन संरक्षक गणेश मिसाळ, संगमनेरचे सहाय्यक उपवन संरक्षक अमरजित पवार, राहुरीचे वनपरिक्षेत्र सुनिल साळुंखे यांना घटना कळवली. राहुरी वनविभागाचे अधिकारी सुनिल साळुंखे, वनपाल एल. पी. शेंडगे, वनरक्षक एस. आर. कोरके, एन. वाय. जाधव, एम एच. पठाण, घनदाट, झावरे, ड्रायवर ताराचंद गायकवाड यांचे पथक घटनास्थळी पोहचले. साळुंखे यांनी परिस्थितीचे गांभीर्य पाहून संगमनेरची रेस्क्यु टीम बोलावली.
रेस्क्यु टीमचे गण एक्सपर्ट संतोष पारधी, अरुण साळवे, प्रविण चव्हाण हे पोशाख परिधान करुन व गण लोड करून ट्रॅक्टरवर बसून ऊसाच्या शेतात घुसले. बिबट्या टप्प्यात आल्याबरोबर संतोष पारधी यांनी पहिल्याच डार्टमध्ये बिबट्या बेशुद्ध केला. सोनगावचे पशुसंवर्धन अधिकारी डॉ. प्रदीप सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली बिबट्यास डार्ट मारण्यात आला. बिबट्या बेशुद्ध झाल्याची खात्री पटताच प्राणीमित्र व रेस्क्यु टीम आणि राहुरी वनविभागाचे कर्मचारी यांनी बिबट्यास ट्रेचरवर टाकून उसातून बाहेर काढले.
रेस्क्यु केलेला बिबट्या हा मादी जातीचा व सहा ते सात वर्षे वयाचा आहे. बिबट्या जेरबंद झाल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरली आणि बघ्यांची खुपच गर्दी जमली. या वेळी रमेश दिघे, अनिल दिघे, सुनिल पाटोळे, जगदीश दिघे, ललित दिघे, पवन दिघे, सोमनाथ दिघे, पंकज दिघे, राहुल दिघे, नितीन दिघे, नंदू दिघे यांनी मदतकार्य केले.
घटना स्थळी गण एक्सपर्ट संतोष पारधी यांनी मोहीम फत्ते केल्याबद्दल व रमेश दिघे यांनी नुकसान होत असतानाही ट्रॅक्टर ऊसात घालू दिल्याबद्द्ल दोघांचेही उपस्थितांनी आभार मानले.
धानोरे येथे थरार; भुलीनंतर ‘ती’ अखेर जेरबंद