

लांजा : शेजारच्याच घरावर डल्ला मारून लंपास केलेले तब्बल साडेतीन लाखांचे सोन्याचे दागिने थेट मुंबईतून हस्तगत करण्यात लांजा पोलिसांना मोठे यश आले आहे. अत्यंत शिताफीने तपास करत पोलिसांनी संशयित चोराला ताब्यात घेतले असून, ‘कुंपणानेच शेत खाल्ल्याचा’ हा प्रकार उघडकीस आल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.
लांजा तालुक्यातील रुण पराडकरवाडी येथे काही दिवसांपूर्वी एका घरातून सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची घटना घडली होती. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, लांजा पोलिसांनी केवळ आठवडाभरात या गुन्ह्याचा छडा लावत आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. या प्रकरणी ऋषिकेश अंकुश पराडकर (वय 27, रा. रुण, पराडकरवाडी) याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.
प्रणय पराडकर यांच्या घराचे कुलूप चावीने उघडून कपाटातील सोन्याची चेन चोरण्यात आली होती. तपासादरम्यान, पराडकर यांच्या आणखी एका शेजार्याने त्यांच्या घरातूनही सोन्याचे गंठण चोरीला गेल्याची तक्रार दिली. संशयित ऋषिकेशची त्यांच्या घरीही ये-जा होती. दोन्ही तक्रारींनंतर पोलिसांनी ऋषिकेशला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवताच त्याने दोन्ही चोर्या केल्याची कबुली दिली. लांजासारख्या ग्रामीण भागातून चोरी करून महानगरात लपवलेला मुद्देमाल हस्तगत करण्याच्या या कामगिरीमुळे लांजा पोलिसांच्या तपास कौशल्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
या गुन्ह्याच्या तपासाबाबत पोलीस निरीक्षक नीळकंठ बगळे यांनी माहिती दिली. प्रणय संजय पराडकर (वय 25) यांनी आपल्या घरातून 45 हजार रुपये किमतीची, 5 ग्रॅम वजनाची सोन्याची चेन चोरीला गेल्याची तक्रार दाखल केली होती. त्यांनी आपला संशय शेजारी राहणार्या ऋषिकेश पराडकर याच्यावर व्यक्त केला होता.
चोरीचे दागिने मुंबईत विकल्याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक नीळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली एक विशेष पथक तयार करण्यात आले. पोलीस हेडकॉन्स्टेबल नासीर नावळेकर, विलास जाधव आणि पोलीस कॉन्स्टेबल नितेश आर्डे यांचे पथक 6 ऑगस्ट रोजी मुंबईला रवाना झाले. संशयिताने दिलेल्या माहितीनुसार, पथकाने मुंबईतील सांताक्रूझ परिसरातून 7 ऑगस्ट रोजी चोरीला गेलेला सर्व मुद्देमाल जप्त केला. यामध्ये सोन्याचे दागिने असून, त्यांची एकूण किंमत 3 लाख 55 हजार रुपये आहे.