

आश्वी : आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुकांचे रणशिंग फुंकले गेले आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात या दोन्ही दिग्गजांनी आश्वी आणि जोर्वे गटात जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यामुळे हे दोन्ही गट राजकीय दृष्ट्या प्रतीष्ठेचे बनले आहेत.(Latest Ahilyanagar News)
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नुकतेच जोर्वे आणि आश्वी गटातून कार्यकर्ता मेळावे घेतले. या मेळाव्यांमध्ये त्यांनी कार्यकर्त्यांना येणाऱ्या निवडणुकांसाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले. विधानसभेप्रमाणे या निवडणुकीतही शतप्रतिशत विजय आपलाच आहे, असे सूचक वक्तव्य करत त्यांनी कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवला. विखे गटाकडून विजयासाठी कंबर कसण्यात आली असून, नियोजनबद्ध पद्धतीने तयारी सुरू असल्याचे चित्र आहे.
दुसरीकडे, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सहकारी संस्थांच्या माध्यमातून गावागावांत कार्यकर्त्यांच्या बैठका घेण्यास सुरुवात केली आहे. या बैठकांमध्ये ते संभाव्य उमेदवारांची चाचपणी करत असून, निवडणुकीची रणनीती आखत आहेत. थोरात गटही या निवडणुकांना गांभीर्याने घेत असून, विजयासाठी कोणतीही कसर सोडणार नाही, असे दिसत आहे.
या दोन्ही गटांकडून जाती-समीकरणांनुसार उमेदवारांना संधी दिली जाणार आहे. तरुण आणि नवीन चेहऱ्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेक अनपेक्षित चेहऱ्यांना अचानकपणे उमेदवारी मिळू शकते, अशी चर्चा राजकीय गोटात सुरू आहे.
या निवडणुकीसाठी भाजप आणि काँग्रेससह राष्ट्रवादी काँग्रेस आणि रिपब्लिकन पक्षाकडूनही उमेदवारीची मागणी होत आहे. त्यामुळे ही निवडणूक बहुरंगी होण्याची शक्यता असून, प्रत्येक जागेवर अडेच लढत पाहायला मिळेल.एकंदरीत, नगर जिल्ह्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अत्यंत चुरशीच्या होणार असून, विखे आणि थोरात यांच्यातील ही राजकीय लढत पाहण्यासाठी जिल्ह्याची जनता उत्सुक आहे.
आश्वी गटात यंदा महिलांचे राज्य दिसणार आहे. या गटातील दोन गणांसह गटावरही महिलाच नेतृत्व करताना दिसतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. याउलट, जोर्वे गटात मात्र पुरुषांची मक्तेदारी कायम राहणार असल्याचे चित्र आहे. दोन्ही गटांकडून ही निवडणूक प्रतिष्ठेची बनल्यामुळे उमेदवारी देताना मोठी गुंतागुंत निर्माण होणार आहे. अनेक इच्छुकांमुळे उमेदवारी निश्चित करणे दोन्ही नेत्यांसाठी आव्हान ठरणार आहे. या परिस्थितीत नाराज झालेले अनेक जण अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे, ज्यामुळे निवडणुकीची रंगत आणखी वाढेल.