

नगर: जात प्रमाणपत्र पडताळणीची प्रक्रिया अधिक सुलभ, पारदर्शक आणि गतिमान करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस कंपनीच्या माध्यमातून ऑनलाइन प्रणाली सुरू करण्यात आली आहे.
आता अर्जदारांना घरबसल्या जात पडताळणीचा अर्ज भरता येणार असून, आवश्यक कागदपत्रे अपलोड करण्यापासून ते अर्जाची माहिती मिळवण्यापर्यंतची प्रक्रिया ऑनलाइन करता येईल. कागदपत्रांच्या हार्ड कॉपी कार्यालयात जमा करण्याची आवश्यकता राहणार नाही. जात पडताळणीसाठी यापुढे अर्जदारांनी https://ccvis.barti.in या अधिकृत संकेतस्थळावर आधारकार्डाच्या आधारे नोंदणी करावी.
जात प्रमाणपत्रावरील बारकोड क्रमांक नमूद केल्यास प्रमाणपत्राची माहिती अर्जात उपलब्ध होईल. ऑनलाइन अर्ज केलेल्या अर्जदारांना नव्याने अर्ज करण्याची आवश्यकता नाही. अर्जदार स्वतः अर्ज क्रमांक आणि ओटीपीद्वारे आपल्या प्रमाणपत्राचे स्टेटस पाहू शकतो. नागरिकांनी अधिकृत संकेतस्थळाचा वापर करण्याचे आवाहन समिती अध्यक्ष मोनिका सिंह, सदस्य बलभीम शिंदे, सदस्य सचिव अनिल तिदमे यांनी केले आहे.
अर्ज करताना प्रयोजनानुसार विहीत नमुन्यातील शपथपत्रे, जात आणि मोडी लिपीतील पुराव्यांच्या वाचनीय मूळ रंगीत प्रती, ‘१५ अ’, बोनाफाईड, शालेय व महसुली पुरावे यांच्या वाचनीय मूळ प्रती स्कॅन करून अपलोड कराव्यात. आवश्यक असल्यास अर्जदारांची सुनावणीही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेण्यात येणार आहे. त्यामुळे अर्जदारांचा वेळ आणि प्रवास वाचणार आहे.
अर्जदारांनी दलालांच्या आमिषाला बळी न पडता स्वतः ऑनलाइन अर्ज भरावा. ऑनलाइन प्रणालीचा लाभ घेऊन नागरिकांनी जात पडताळणीची प्रक्रिया सुलभ करावी.
अनिल तिदमे, सदस्य सचिव, जातपडताळणी समिती, अहिल्यानगर