

संगमनेर : लोकशाहीमध्ये विरोधी पक्षांमध्ये मत- मतांतरे असतात, परंतू सध्या महाराष्ट्रात अक्षरशः धुमाकूळ सुरू आहे. महानगरपालिकेनिमित्त राज्यातील राजकीय परिस्थिती अवघड झाली आहे. अशी बिकट परिस्थिती यापूर्वी कधीही उद्भवली नव्हती, अशी खंत व्यक्त करीत, कुठे चाललाय महाराष्ट्र याची चिंता वाटत आहे. राजकारण सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी करायचे असते, मात्र सध्या सत्तेसाठी सुरू असलेली चढाओढ दुर्दैवी आहे, असे प्रतिपादन माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.
संगमनेर नगरपालिका प्रांगणात क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ यांची संयुक्त जयंती व नवीन पदाधिकाऱ्यांच्या पदग्रहण सोहळ्यात ते बोलत होते. व्यासपीठावर माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, उद्योगपती राजेश मालपाणी, जर्मनी येथून आलेल्या माजी खासदार क्लोडिया नॉलटे, गिरीश मालपाणी, मनीष मालपाणी, रणजितसिंह देशमुख, डॉ. जयश्री थोरात, माजी नगराध्यक्ष दिलीप पुंड, विश्वास मुर्तडक, किशोर पवार, गजेंद्र अभंग, किशोर टोकसे, नगरसेवक सीमा खटाटे, नगरपालिका मुख्याधिकारी दयानंद गोरे, उप मुख्य अधिकारी पेखळे, राजेंद्र गुंजाळ, भारत बोऱ्हाडे, अर्चना दिघे, सौरभ कासार, शोभा पवार, प्राची काशीद ,किशोर पवार, अनुराधा सातपुते, वनिता गाडे, गजेंद्र अभंग, मालती डाके, नितीन अभंग, दीपाली पांचारीया, गणेश गुंजाळ, अमजद पठाण, विजया गुंजाळ, शकीला शेख, नूर मोहम्मद शेख, सरोजना पगडाल, डॉ. दानिश, किशोर टोकसे, प्रियांका शहा, शैलेश कलंत्री, नंदा गरुडकर, मुजीब खान पठाण आदी उपस्थित होते.
थोरात म्हणाले की, 1991 मध्ये डॉ. सुधीर तांबे यांनी नगराध्यक्षपदी काम सुरू केले. तेव्हापासून नगरपालिकेचा कारभार अत्यंत आदर्श सुरु होता. अनेक मोठ-मोठी विकास कामे मार्गी लागली. हॅप्पी हायवे उद्घाटनवेळी सर्व संगमनेरकर आनंदी होऊन एकत्र आले, मात्र काही लोकांनी त्यावेळी रस्तारोको करण्याचा प्रयत्न केला, अशी नाराजी त्यांनी व्यक्त करीत, स्वच्छता, बंधुभाव, एकात्मता ही आपली संस्कृती आहे. आम्ही कुणाचाही द्वेष करीत नाही. राज्यात सर्वाधिक मोठा विजय मिळाला आहे. या विजयाचे श्रेय संगमनेरकर सर्व जनतेला आहे, असे थोरात म्हणाले.
आमदार सत्यजित तांबे म्हणाले की, प्रत्येक नागरिकाला मुलभूत अधिकार असतात. तसेच मुलभूत कर्तव्यसुद्धा असतात. संगमनेर शहराला पुढे घेऊन जाण्यासाठी कटिबद्ध आहे. यामध्ये नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा आहे. पुढील काळात प्रत्येक नगरसेवकाचे काम व त्याचे मूल्यमापन नागरिकांना घरपोहच केले जाणार आहे. नगरपालिकेचे ऑडिट व बॅलन्स शीटसुद्धा वेबसाईटवर टाकले जाणार आहे, असे सांगत, काही लोकप्रतिनिधींनी अर्धवट माहितीच्या आधारे निवडणूक काळात भाषणे केली. पालिकेला फक्त 15 कोटी रुपये उत्पन्न मिळते तर, साधारण 165 कोटी रुपये खर्च असतो. 150 कोटी रुपये शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून मिळवावे लागतात, असे त्यांनी सांगिल्याचे स्पष्ट करीत आमदार तांबे यांनी नामोल्लेख न करता खिल्ली उडविली.
राजेश मालपाणी म्हणाले की, लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर शहराला सुसंस्कृत परंपरा लाभली आहे. हे चांगले काम नुतन नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांच्या नेतृत्वातून पुढे जाईल, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी सरोजना पगडाल, प्राची शहा जर्मनीच्या खासदार क्लोडिया नॉलटे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक मुख्याधिकारी दयानंद गोरे यांनी केले. सूत्रसंचालन सुविधा अरासिद्ध व शोभा हजारे यांनी केले. प्रमिला अभंग यांनी आभार मानले.
लोकशाहीने मत- मतांतरे, सत्ताधारी- विरोधी पक्ष दिला आहे. महानगरपालिका निवडणुकीनिमित्त राज्यातील विदारक चित्र समोर आले आहे. विविध पक्षांमध्ये तिकिट वाटपावरून उडालेला गोंधळ. निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय, बाहेरच्यांना संधी, यामुळे निर्माण झालेला रोष, भांडण, तंटे अगदी एकमेकांचा जीव घेण्यापर्यंत मारामाऱ्या असा धुमाकूळ राज्यात सध्या सुरु आहे. असे विदारक दृश्य यापूर्वी कधीही पाहिले नव्हते. कुठे चाललाय महाराष्ट्र? असे राजकारण महाराष्ट्रासाठी चांगले नाही. संगमनेरच्या उज्ज्वल संस्कृतसह सुसंस्कृत राजकारणाची परंपरा आपल्याला जपायची आहे.
माजी मंत्री बाळासाहेब थोरात, संगमनेर.
नागरिकांशी चर्चा करून, प्रभाग समिती नियुक्त करणार आहे. त्या विभागात करावयाची कामे जनतेच्या सहकार्याने करू. संगमनेर शहरातील बेशिस्त प्रकारांना आळा घालण्यासाठी काही कटू निर्णय करावे लागणार आहेत. बेशिस्त पार्किंगसह अमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी प्रशासनाने प्रभावी काम करावे.
आमदार सत्यजित तांबे, संगमनेर.
संगमनेर ः नगरपालिका प्रांगणात क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ यांची संयुक्त जयंती व नवीन पदाधिकाऱ्यांच्या पदग्रहण सोहळ्यात बोलताना माजी मंत्री बाळासाहेब थोरात. (छाया ः शिवाजी क्षिरसागर)