

नगर : बालविवाह मुक्त भारत अभियानामध्ये अहिल्यानगर जिल्ह्याने देशात प्रथम क्रमांक पटकावून उल्लेखनीय कामगिरी केली आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच त्यांच्या सुविद्य पत्नी शालिनीताई विखे पाटील यांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग घेत बालविवाह मुक्तीची शपथ घेतली. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील सर्व नागरिकांना बालविवाह मुक्तीची शपथ घेण्याचे आवाहन केले.
नगर जिल्हा वैयक्तिक शपथ घेण्याच्या उपक्रमामध्ये देशात प्रथम क्रमांकावर असून, आतापर्यंत जिल्ह्यातील 43 हजार 601 नागरिकांनी शपथ घेऊन प्रमाणपत्र प्राप्त केले आहे. तर उत्तर प्रदेशमधील महाराजगंज जिल्हा द्वितीय क्रमांकावर आहे.
‘बालविवाह मुक्त भारत’ हे 100 दिवशीय अभियान दिनांक 27 नोव्हेंबर ते 8 मार्च या कालावधीत केंद्र शासनामार्फत राबविण्यात येत आहे. केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी या अभियानाची सुरुवात विशाखापट्टणम येथून केली आहे.
या अभियानांतर्गत बालविवाह मुक्तीच्या संदर्भात विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. यामध्ये वैयक्तिक शपथ उपक्रम, बालविवाह प्रतिबंधक अधिकाऱ्यांंचे प्रशिक्षण, तसेच समाजात बालविवाहविषयक व्यापक जनजागृती यांचा समावेश आहे. या सर्व उपक्रमांमध्ये सहभाग नोंदवित नगर जिल्ह्याने संपूर्ण देशात प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे.
अभियानाच्या पुढील टप्प्यात शाळा व महाविद्यालयांमधून विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये बालविवाहविषयक निबंध लेखन, वादविवाद व वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला, रांगोळी, काव्यवाचन तसेच कथाकथन स्पर्धांचा समावेश आहे. तसेच विवाहाशी संबंधित सर्व घटक-मंगल कार्यालये, बँडवाले, स्वयंपाकी-आचारी, तसेच विविध धर्मांचे धर्मगुरू-यांच्यामध्ये बालविवाह प्रतिबंधाबाबत जागरूकता वाढविण्यात येणार आहे.
बालविवाह मुक्तीच्या दृष्टिने लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने विशेष ग्रामसभा घेऊन बालविवाह मुक्त गाव घोषित करण्यात येणार आहेत. शहर पातळीवर प्रभाग स्तरावर जनजागृती मोहिमा राबविण्यात येणार असून, शाळाबाह्य मुलींवर विशेष लक्ष ठेवून त्यांच्या कुटुंबीयांशी थेट संवाद साधला जाणार आहे. यासोबतच, या अभियानात विशेष कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींना पुरस्कृत करण्यात येणार आहे.
अहिल्यानगर जिल्हा पूर्णतः बालविवाह मुक्त करण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले आहे.