

खेड : एकेकाळी दुष्काळाची छाया आणि पाण्याअभावी ओसाड झालेली शेती अशी ओळख असलेल्या कर्जत तालुक्यातील करपडी गावाने आज इतिहास रचला आहे. पाणी व्यवस्थापन, आधुनिक शेतीतंत्र आणि तरुणाईच्या जिद्दीच्या जोरावर या गावात केळीच्या बागा बहरल्या असून, येथील केळीने थेट जागतिक बाजारपेठेत प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे करपडीतील केळीची इराणमध्ये निर्यात सुरू झाली आहे.
करपडीतील नीलेश काळे या उच्चशिक्षित तरुण शेतकऱ्याने नोकरीच्या मागे न धावता शेतीत नवं स्वप्न पाहिलं आणि ते प्रत्यक्षात उतरवलं. आधुनिक शेती पद्धती, काटेकोर पाणी नियोजन आणि सातत्यपूर्ण मेहनतीच्या जोरावर त्यांनी उत्कृष्ट दर्जाची, भरदार केळी पिकवली. या केळीला थेट परदेशी बाजारपेठेत मागणी मिळत असून, 17 रुपये प्रतिकिलो असा समाधानकारक दर मिळाला आहे. हा दर केवळ आर्थिक यशाचं प्रतीक नाही, तर एकेकाळी दुष्काळी म्हणून हिणवलेल्या गावातील शेतकऱ्याच्या कष्टाला मिळालेली जागतिक पातळीवरील मान्यता आहे. आजवर दुष्काळाचे वर्चस्व असलेल्या करपडी गावाने आता केळीच्या घडामधून परदेशी बाजारपेठेत स्वतःची नवी ओळख निर्माण केली आहे.
शेतीत धाडस, नियोजन आणि जिद्द असेल तर अशक्य काहीच नाही, हे काळे यांच्यासह करपडीतील तरुण शेतकऱ्यांनी कृतीतून सिद्ध करून दाखवले आहे. त्यांच्या या यशामुळे परिसरातील तरुणांना शेतीकडे नव्या दृष्टीने पाहण्याची प्रेरणा मिळत आहे.
नोकरी म्हणजेच यश नाही, मातीवर विश्वास ठेवला, पाण्याचं योग्य नियोजन केलं आणि जिद्द सोडली नाही, तर दुष्काळी गावातूनही जागतिक बाजारपेठ गाठता येते. शेती ही मागासलेली नाही, तर संधींनी भरलेली आहे. गरज आहे ती फक्त धाडस, आधुनिक विचार आणि सातत्यपूर्ण मेहनतीची असते.
नीलेश काळे, केळीउत्पादक शेतकरी