

संगमनेर: संगमनेर नगरपालिकेचे नवनिर्वाचित पदाधिकारी आज शनिवारी पदभार स्वीकारणार आहे. यामुळे नगराध्यक्षासह उपनगराध्यक्ष व नगरसेवकांच्या मिटिंग हॉलची डागडुजी व स्वच्छता करण्यात आली. गेली चार वर्षे बंद असलेले नगराध्यक्षांच्या कार्यालयाचे दरवाजे उघडण्यात आले आहे. तर उपनगराध्यक्षपदाची कॅबीनही सज्ज करण्यात आली असून, या ठिकाणी कोणाला संधी मिळते, याकडे लक्ष आहे.
पालिकेत गेल्या चार वर्षांपासून कोविडच्या संकटासह प्रशासकराज होते. यामुळे पालिकेचा सर्व कारभार हा मुख्याधिकाऱ्यांकडे असून तेच सर्व निर्णय घेत होते. यामुळे पालिकेत अधिकारी कर्मचाऱ्यांची मनमानी सुरू होती. नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांचे कार्यालय व पालिकेचे रामकृष्ण सभागृह बंदच होते. संगमनेर नगरपालिकेची निवडणूक प्रक्रीया नुकतीच पार पडली. या निवडणुकीत इंडियन फार्वड ब्लॉक संगमनेर सेवा समितीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार डॉ. मैथिली सत्यजित तांबे या नगराध्यक्षपदी जनतेतून निवडुन आल्या. पालिकेत एकुण 30 नगरसेवकांपैकी 27 नगरसेवक संगमनेर सेवा समितीचे तर दोन नगरसेवक अपक्ष निवडून आले असून शिवसेना शिंदे गटाच्या एक नगरसेविका निवडून आल्या आहे. यामुळे पालिकेत संगमनेर सेवा समितीची म्हणजेच माजी मंत्री बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांची निर्विवाद एक हाती सत्ता असणार आहे.
निवडणुका होऊन दहा दिवसांचा कालावधी उलटला आहे. यामुळे पदभार स्वीकारण्याकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले होते. नगराध्यक्ष नगरसेवक आज शनिवारी 3 जानेवारी रोजी पदभार स्वीकारणार आहे. यामुळे नगराध्यक्षा उपनगराध्यक्ष कार्यालयांची डागडुजी साफसफाई रंग रंगोटी शुक्रवारी करण्यात आली. नगराध्यक्षा डॉ. मैथिली सत्यजित तांबे या नावाची पाटी दरवाजाबाहेर लावण्यात आली आहे. काही खुर्च्यांही बदलण्यात आल्या आहे. मोठया कालावधीनंतर पदाधिकारी कार्यालयात येणार असल्याने नागरिकांसह कर्मचाऱ्यांना उत्सुकता आहे. माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांच्या सुनबाई डॉ. मैथिली तांबे पदभार स्वीकारणार आहे. त्यांच्याबरोबर सर्वच नगरसेवक पालिकेत हजर राहणार आहे.
दरम्यान, गेल्या चार वर्षांपासून विना पदाधिकारी सुरू असलेला पालिकेचा कारभाराला गती येवून शहरातील रस्ते, गटारी, सार्वजनिक स्वच्छता, फ्लेक्सची गर्दी, विज व पाण्याचे प्रश्न सुटतील, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहे. पालिकेची विस्कटलेली घडी बसविण्याचे मोठे आव्हान नवनिर्वाचित नगराध्यक्षा मैथिली तांबे यांचेसमोर आहे. त्यांना यापूर्वी कुठलाच अनुभव नसल्याने त्यांची सारी भिस्त आमदार सत्यजित तांबे व माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांच्यावर असणार आहे.
सभागृहात विरोधी पक्ष नेताच नाही
नगरसेवक दिलीपराव पुंड, विश्वासराव मुर्तडक, गजेंद्र अभंग, किशोर पवार, किशोर टोकसेसह काही अनुभवी नगरसेवक असल्याने त्याचा सत्ताधाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. योगेश अशोक जाजू व दिलशाद आजिज शेख हे दोन अपक्ष नगरसेवक असले तरी ते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना मानणारे आहे. एकमेव शिंदे गटाच्या साक्षी विनोद सूर्यवंशी या विरोधी नगरसेविका आहेत. यामुळे पालिकेत आता विरोधी पक्षनेता नसेल.
उपनगराध्यक्ष पदी कोणाला संधी?
उपनगराध्यक्ष पद कोणाला मिळते, याकडे सर्वांचे लक्ष आहे. यासाठी दिलीपराव पुंड, विश्वासराव मुर्तडक, गजेंद्र अभंग, अपक्ष योगेश जाजू यांचेसह काही महिला नगरसेविकांची नावे चर्चेत आहे.तर अनेकांनी यासाठी माजीमंत्री बाळासाहेब थोरात, आमदार सत्यजित तांबे यांना साकडे घातले आहे. मात्र उपनगध्यक्षपद अनुभवी नगरसेवकांना दिले जाणार असल्याचे संकेत आहे.
स्वीकृतची लॉटरी कोणाला?
संगमनेर नगरपालिकेत तीन स्वीकृत नगरसेवक असणार आहे. सेवा समितीची एक हाती सत्ता आल्याने तीनही स्वीकृत नगरसेवक पदाची संधी सत्ताधारी पक्षाकडे असल्याने निवडणूक प्रक्रीया पार पडताच अनेकांनी तशी गळ घातली. यासाठी शहरातील अनेक मान्यवरांची नावे चर्चेत आहे. मात्र संधी कोणाला मिळते, हे लवकर स्पष्ट होणार आहे.
नवीन पदाधिकारी पदभार स्वीकारणार असल्याने नगराध्यक्ष कार्यालयाची तसेच इतर काही ठिकाणी साफ सफाई, डागडुजी, रंगरंगोटी करण्यात आली आहे. पदभार स्वीकारल्यानंतर पालिकेच्या वतीने नगराध्यक्षांचा सत्कार करण्यात येणार आहे.
दयानंद गोरे, मुख्याधिकारी संगमनेर, न.पा.