

नगर: नियम मोडण्याची मानसिकता बदलून रस्ता सुरक्षा नियमाचे पालन केल्यास अपघात नक्कीच टळतील, असा विश्वास एसटी महामंडळाचे अहिल्यानगर विभाग नियंत्रक राजेंद्र जगताप यांनी व्यक्त केला.
तारकपूर आगारात एसटीच्या सुरक्षितता अभियानाचे उद्घाटन गुरुवारी (दि.1) विभाग नियंत्रक राजेंद्र जगताप यांच्या अध्यक्षतेखाली झाले. त्या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी पोलिस उपअधीक्षक दिलीप टिपरसे, आरटीओ विभागाचे सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक लक्ष्मण थोरात, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक प्राजक्ता खोमणे, ज्येष्ठ पत्रकार महेश देशपांडे महाराज, रवी कदम, यंत्र अभियंता अविनाश साखरे, सुरक्षा व दक्षता अधिकारी धर्मराज पाटील, विभागीय स्थापत्य अभियंता कैलास काळभोर, तारकपूर आगार व्यवस्थापक अभिजीत चौधरी, तारकपूर बसस्थानक प्रमुख अविनाश कल्हापुरे आदींची उपस्थिती होती.
यावेळी डीवायएसपी टिपरसे, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक थोरात, प्राजक्ता खोमणे, ज्येष्ठ पत्रकार देशपांडे महाराज यांनी मार्गदर्शन करीत सुरक्षित रस्ता वाहतूक आणि प्रवासासाठी आवश्यक असलेल्या नियमांचा जागर केला.
यावेळी एसटीच्या विना अपघाती सेवेसाठी योगदान देणाऱ्या चालक आणि यंत्र शाळेतील कर्मचाऱ्यांचा समायोचित गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप औटी यांनी केले तर तारकपूर बसस्थानक प्रमुख कल्हापुरे यांनी आभार मानले.
दररोजची प्रवासी संख्या 1.44 लाख
अहिल्यानगर विभागातील 11 आगारांत 638 एसटी बस असून, या बसचा रोजचा प्रवास सरासरी 2 लाख किलोमीटरपेक्षा अधिक आहे. रोजची प्रवासी संख्या 1 लाख 44 हजार असून, उत्पन्न 58 लाख रुपये इतके असल्याचे तारकपूर आगार व्यवस्थापक अभिजीत चौधरी यांनी सांगितले.