

करंजी: ग्रामपंचायत प्रशासनाने वारंवार आवाहन करूनही ग्रामस्थ थकित घरपट्टी पाणीपट्टी भरण्यासाठी पुढे येत नसल्याने थकबाकीचा आकडा दोन कोटींच्या पुढे सरकला आहे. थकबाकी वाढल्याने तिसगावकरांना मूलभूत सुविधा देणे ग्रामपंचायतीला अशक्य झाले आहे. पाणीपुरवठा करण्यास अनेक अडचणींचा सामना ग्रामपंचायतीला करावा लागत असल्याने घरपट्टी आणि पाणीपट्टी तसेच ग्रामपंचायतीच्या गाळे भाडे थकित ठेवणाऱ्या सर्वांची नावे ग्रामपंचायत कार्यालयासह मुख्य चौकामध्ये फ्लेक्स बोर्डवर लावली जाणार असल्याचा इशारा ग्रामपंचायत प्रशासनाने दिल्याने थकबाकी धारकांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.
तिसगाव व्यापारी बाजारपेठेचे गाव आहे. पाथर्डीनंतर तिसगाव येथील व्यापारी पेठेचा नावलौकिक आहे. तिसगाव येथे परिसरातील वीस-पंचवीस गावांचे लोक छोट्या मोठ्या व्यवसायाच्या माध्यमातून या ठिकाणी उदरनिर्वाह भागवत आहेत. दररोज कोट्यवधी रुपयांची उलाढाल या तिसगावमध्ये होते.
पूर्वी तिसगाव ग्रामपंचायतकडे वीस पंचवीस एकर हक्काची जागा होती ती जागा अतिक्रमणधारकांनी गिळंकृत केली. त्यामुळे तिसगाव ग्रामपंचायतीला हक्काची जागा उपलब्ध नाही. त्यामुळे जागी अभावी तिसगावचा आठवडे बाजार कुठे आणि कसा भरतो, हे गुरुवारी प्रत्यक्ष पाहिल्यानंतर दिसून आले. तिसगावचा पाणीप्रश्न नेहमीच पुढे येतो पाणीपट्टी भरली नाही, म्हणून तिसगाव ग्रामपंचायतीकडे मिरी तिसगाव नळ योजनेची 35 लाख रुपये थकबाकी आहे. दोन दिवसांपूर्वी तीन लाख रुपये भरले, म्हणून पाणीपुरवठा सुरू करण्याचे अध्यक्ष एकनाथ आटकर यांनी सांगितले असले तरी थकबाकीची टांगती तलवार कायम असल्याने पुन्हा कधीही पाणीपुरवठा खंडित होऊ शकतो.
तिसगाव ग्रामपंचायतला मिरी तिसगाव नळ योजनेचे लाखात देणे असले तरी या ग्रामपंचायतला येणाऱ्या पैशांचा आकडा कोटीत आहे.तिसगाव ग्रामस्थांकडे निव्वळ घरपट्टी एक कोटी तीस लाख रुपये थकित आहे. तर पाणीपट्टी 87 लाख रुपये थकित आहे. या थकबाकीत केवळ सर्वसामान्य नागरिकच नाहीत, तर काही ग्रामपंचायत सदस्यांचाही समावेश असल्याची माहिती समजली. तसेच अनेक धनधांडगे व्यापाऱ्यांचा देखील या थकबाकीदारांत समावेश आहे.
मूलभूत सेवा देण्यासाठी कठोर निर्णय घेण्याची आता वेळ आली आहे. प्रत्येकाने घरपट्टी, पाणीपट्टी वेळेत भरली तर ग्रामपंचायतीला या सर्व सुविधा वेळेत आणि नियमितपणे देता येतील. थकबाकी कोटीच्या घरात गेली आहे अशावेळी नागरिकांना सेवा देणे मोठे अडचणीचे ठरले आहे.
गणेश ढाकणे, ग्रामविकास अधिकारी