

पुणे : भारतीय विमानपत्तन प्राधिकरण आणि इंडिगो च्या नियोजन शून्य कारभारामुळे सोमवारी रात्री अकरा वाजता पासून ते पहाटे दोन वाजेपर्यंत पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरील गेट नंबर 9 समोर जमलेल्या नागपूरला जाणाऱ्या प्रवाशांना विमान उड्डाणास झालेला उशीर आणि किमान बसण्याची देखील व्यवस्था न झाल्यामुळे अत्यंत विदारक परिस्थितीला सामोरे जावे लागले.
संतप्त प्रवाशांनी इंडिकाच्या कर्मचाऱ्यांना जाब विचारला परंतु कोणीही विमानाचे बोर्डिंग उशीर होत असल्याबद्दल तसेच प्रवाशांना बसवण्यासाठी जागाही उपलब्ध नसल्याबद्दल प्रतिसाद देत नव्हते. प्रचंड प्रमाणात गोंधळ होऊन देखील अथोरिटीच्या किंवा इंडिगोच्या एकही वरिष्ठ अधिकाऱ्याने येथे भेट दिली नाही. पहाटे 2:00 वाजेपर्यंत हा गोंधळ सुरू होता. 12:30 वाजता चे फ्लाईट साठी गेट क्रमांक तीन वर बोर्डिंग दाखविण्यात आले होते. परंतु अनाउन्समेंट करून सर्व प्रवाशांना गेट क्रमांक नऊवर बोलावले .
गेट क्रमांक नऊ समोर अगदी मोजक्या खुर्च्यांची व्यवस्था होती. तेथे बसल्यास जागा उपलब्ध नव्हती. त्या गेट क्रमांक 9 वर एअर इंडियाचे विमान लागले होते. जर इथे एअर इंडियाचे विमान होते तर इंडिगोच्या नागपूर प्रवाशांना येथे का बोलावले ? असा प्रश्न प्रवाशांनी विचारला. येथे बसण्यास देखील जागा नसल्यामुळे तब्बल दोन तास प्रवासी ताटकळत उभे राहिले परंतु गेटवरील कर्मचाऱ्यांनी कुठले प्रत्युत्तर दिले नाही. अखेर दीड तासानंतर फ्लाईट तयार आहे परंतु पायलट जयपुर वरून आले नाहीत, ते पोहोचल्यानंतर फ्लाईट निघेल असे उत्तर देण्यात आले.
हे ऐकून प्रवाशांचा संताप अनावर झाला. ज्यांना उभारणे शक्य नव्हते अशा वयोवृद्ध महिला आणि गरोदर मातांनी जमिनीवरच पाय पसरून विश्रांती घेतली. इंडिगोच्या वतीने कुठलीही रिफ्रेशमेंटची व्यवस्था करण्यात आली नाहीच परंतु अखेरपर्यंत कोणत्याही सेवा-सुविधा , माहिती पुरविण्यात आली नाही. किमान गेट क्रमांक बदलून जेथे आसन व्यवस्था उपलब्ध आहे तेथे प्रवाशांना पाठवावे इतके देखील सौजन्य दाखवले नाही.
बराच गोंधळ झाल्यानंतर शेवटी पोलीस आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांनी येऊन प्रवाशांना शांत केले . परंतु विमान कंपन्यांच्या वतीने अखेरपर्यंत कोणीही जबाबदारीने उत्तर देण्यासाठी पुढे आले नाही. अखेर पहाटे दोनच्या दरम्यान विमानात जाण्यासाठी गेट क्रमांक नऊ उघडण्यात आले.
येथील काही कोथरूड स्थित प्रवाशांनी पहाटे येथील गोंधळाचा व्हिडिओ थेट केंद्रीय विमान राज्यमंत्री ना . मुरलीधर मोहोळ यांना पाठविला आणि त्यांना मदतीची विनंती केली. ना. मोहोळ यांनी तातडीने मेसेजला प्रतिसाद देऊन विमान अधिकाऱ्यांशी संपर्क साधला . परंतु त्यानंतर पोलिसांना पाठवून येथील परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे काम एअरपोर्ट अथोरिटीने केले. प्रत्यक्षात प्रवाशांची सोय केली नाही.