Nashik Citylink Bus : सिटीलिंकवर पुन्हा संपाचे सावट

सिटीलिंक बससेवा, www.pudhari.news
सिटीलिंक बससेवा, www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; गेल्या दोन वर्षांत तब्बल पाच वेळा संपाची झळ सोसावी लागलेल्या सिटीलिंकच्या शहर बससेवेवर पुन्हा एकदा संपाचे सावट पसरले आहे. बससेवा तोट्यात सुरू असताना १.४० कोटींचा दंड माफ होण्यासाठी वाहक पुरवठादार ठेकेदाराने सिटीलिंक कंपनीवर दबाव टाकत कोणत्याही क्षणी संप पुकारण्याचा इशारा दिला आहे, तर दिवाळीनिमित्त बोनसच्या मागणीसाठी वाहकांनीदेखील संपावर जाण्याचा अल्टिमेटम दिल्याने एेन सणासुदीच्या काळात सिटीलिंक प्रशासनाची कोंडी झाली आहे.

संबधित बातम्या :

महापालिकेला मात्र या बससेवेतून तब्बल ११० कोटींचा तोटा सहन करावा लागला आहे. त्यातच वाहक पुरवठादाराच्या आडमुठेपणामुळे सिटीलिंकला गेल्या दोन वर्षांत तब्बल पाच वेळा संपाला सामोरे जावे लागले. दरम्यान, वाहक पुरवठादार ठेकेदाराला आजवर विविध कारणांमुळे तब्बल १.४० कोटींचा दंड करण्यात आला आहे. हा दंड नियमबाह्य असल्याचा आरोप करत दंडमाफीसाठी ठेकेदाराने पालकमंत्री दादा भुसे यांच्याकडे धाव घेतली आहे. भुसे यांनी या संदर्भात आयुक्त तथा प्रशासक डॉ. अशोक करंजकर यांना लक्ष घालण्यासाठी सांगितल्यावर त्यांनी सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले होते. मात्र, दंड समायोजनाचा निर्णय अद्याप न झाल्याने तसेच वाहकांमार्फतही बोनस व अन्य मोबदलांचा लाभ मिळण्यासाठी तगादा लावला जात असल्यामुळे वाहक पुरवठादार ठेकेदाराने आता सिटीलिंक कंपनीवर दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरू केला असून, त्याचाच एक भाग म्हणून दंड समायोजित न केल्यास सेवा बंद करण्याचा इशारा सिटीलिंकला दिला आहे. त्यावर सोमवारी निर्णय होणे अपेक्षित असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

पर्यायी वाहक पुरवठादार नियुक्ती रखडली

वाहक पुरवठादार मॅक्स सिक्युरिटीज‌् अॅण्ड सर्व्हिसेस कंपनीमुळे सिटीलिंकला आजवर पाच वेळा संपाला सामोरे जावे लागले आहे. एकाच ठेकेदाराची मक्तेदारी निर्माण झाल्यामुळे सिटीलिंकच्या सेवेत संपामुळे खंड पडत असल्याने नाशिकरोड डेपोतून सुटणाऱ्या १०० बसेसकरिता १६९ वाहक पुरवठ्यासाठी पर्यायी पुरवठादार नेमण्यासाठी प्रशासनाने निविदा प्रक्रिया राबविली. त्यासंदर्भातील प्रस्तावाला आॅगस्टमध्ये झालेल्या सिटीलिंकच्या संचालक मंडळाच्या बैठकीत मंजुरीही देण्यात आली. मात्र, संबंधित पुरवठादारास कार्यारंभ आदेश दिला गेलेला नाही. हा कार्यारंभ आदेश न देण्यामागील कारणे काय याविषयी आता उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.

सिटीलिंकमध्ये २४० दिवसांपेक्षा अधिक काळ कार्यरत असणाऱ्या वाहकांना साधारण १२,५०० बोनस देणे बंधनकारक आहे. असे वाहक किती व बोनसचे नियोजन काय याची महिती मागवली आहे.

– मिलिंद बंड, महाव्यवस्थापक, सिटीलिंक

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news