Pune Garbage News : मग आम्ही कचर्‍याचे करायचे काय? नागरिकांचा प्रशासनाला सवाल | पुढारी

Pune Garbage News : मग आम्ही कचर्‍याचे करायचे काय? नागरिकांचा प्रशासनाला सवाल

पुणे; पुढारी वृत्तसेवा : महापालिकेने कचर्‍याचे कंटेनर उचलून नेले, कचरावेचक पैसे घेतल्याशिवाय कचरा घेत नाहीत, कचरावेचक केव्हा येतात तर केव्हा येत नाहीत, दुकान बंद केल्यानंतर कचरा ठेवण्याची कोणतीही व्यवस्था नाही. मग आम्ही कचर्‍याचे करायचे काय? असा सवाल नागरिकांनी व व्यावसायिकांनी महापालिका प्रशासनाला विचारला आहे.

शहरात जागोजागी कचर्‍याचे ढीग दिसतात. या पार्श्वभूमीवर दै. ‘पुढारी’च्या टीमने शहरातील विविध भागांत पाहणी केली. या पाहणीत अनेक नागरिक रात्रीच्या वेळी रस्त्याच्या कडेला, स्वच्छतागृहांच्या बाजूने व आडोशाला कचरा टाकत असल्याचे समोर आले. कचरा पेट्यामुक्त (कंटेनरमुक्त) शहर करण्यासाठी महापालिका प्रशासनाने रस्ता आणि मानवी वस्तीलगतच्या कचरापेट्या काढल्या असल्या, तरी त्याच जागेवर नागरिक कचरा आणून टाकतात.

काही लोक दुचाकीवरूनच कचर्‍याच्या पिशव्या भिरकावत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. तर खाद्यपदार्थ आणि कपड्याचे व्यावसायिक दुकान बंद करतेवेळी सर्व कचरा रस्त्यावर टाकताना दिसले. या सर्वांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी आपले गार्‍हाणे मांडत या कचऱ्याचे आम्ही काय करायचे ? असा सवाल करत प्रशासनाने रात्री कचरापेट्या ठेवून पहाटे उचलून न्याव्यात, असा सल्ला दिला आहे.

‘आम्ही सांगावे तरी कुणाला ?’

संपूर्ण परिसरातील लोक रात्रीच्या वेळी कचरा टाकतात. तर दुसरीकडे तो कचरा दररोज उचलला जात नाही. त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून, अनेकवेळा येथे कचरा टाकू देऊ नका, अशी विनंती केली. मात्र, प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. आम्ही सांगावे तरी कोणाला, असा प्रश्न सहकारनगर परिसरातील नागरिकांनी उपस्थित केला आहे.

‘दुसरा पर्याय नाही’

लोहियानगर झोपडपट्टी दाट लोकवस्ती असून, येथे नागरिकांनाच राहण्यासाठी जागा अपुरी पडते. तर दुसरीकडे कचरा घेण्यासाठी कोणाही येत नाही. त्यामुळे येथील नागरिक कचरा रस्त्यावरच आणून टाकतात. त्यांना दुसरा पर्याय नाही, असे शेख फारुख यांनी सांगितले.

महापालिका प्रशासनाने रात्रीच्या वेळी लक्ष्मी रस्त्यावरील कचरा उचलण्याची घोषणा केली होती. दुकाने बंद झाल्यानंतर रस्ता स्वच्छ केला जाणार होता. मात्र, घोषणेनंतर पुढे काहीही झाले नाही. रस्त्यावरील कचरा थेट पहाटे किंवा सकाळीच उचलला जातो. दुकानातील कचरा आम्ही घरी न्यायचा का ? यावर तोडगा काढण्यासाठी महापालिकेने रात्रीच्या वेळी रस्त्याच्या कडेला कचरापेट्या ठेवाव्यात, व्यावसायिक त्यात कचरा टाकतील, त्यानंतर या पेट्या पहाटे हलवाव्यात.

– लक्ष्मी रस्त्यावरील एक व्यावसायिक.

झोपडपट्टी परिसरातील कचरा पूर्वी मोफत स्वीकारला जात होता. आता मात्र, कचरा घेण्यासाठी पैशांची मागणी केली जाते. पैसे नाही म्हटल्यावर काही दिवस कचरा घेतला जातो. त्यानंतर मात्र, कचरा घेण्यासाठी कधी येतात, कधी येत नाहीत. मग कचरा आम्ही घरात साचवून ठेवायचा का? घरे लहान असल्याने घरात कचर्‍याचा वास येतो, बाहेर ठेवला तर नागरिकांना अडथळा होतो. मग काय करायचे ?

– दांडेकर पूल परिसरातील एक महिला.

ओला व सुका कचरा विलगीकरणाचे महत्त्व तसेच स्वच्छतेबाबत महापालिकडून वस्ती परिसरामध्ये जनजागृती करण्याची आवश्यकता आहे. कचरा संकलित करणारे पैसे मागतात, त्यामुळे पूर्वीपासून चालत आलेल्या ठिकाणी कचरा टाकण्याखेरीज पर्याय उरत नाही. शहर कचरापेटीमुक्त करत परिसर स्वच्छ ठेवायचाच असेल, तर पालिकेने वस्ती पातळीवर विनाशुल्क कचरा गोळा करण्याची आवश्यकता आहे.

– अनिल कुर्हाडे, रहिवासी, वडारवाडी.

हेही वाचा

Manushi Chhillar : मानुषी छिल्लरचा २०२३ मधील अभूतपूर्व प्रवास, २०२४ फॅन्ससाठी सरप्राईज

Pune PMP News : पीएमपीचे तिकीट आता एका क्लिकवर; पीएमपी करणार अ‍ॅप लाँच

Maratha Reservation : मराठा आरक्षणप्रश्नी डेडलाईन २४ ला संपणार

Back to top button