आमदार अपात्रता : एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे यांनाही नोटिसा | पुढारी

आमदार अपात्रता : एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे यांनाही नोटिसा

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : आमदार अपात्रताप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या प्रकरणाच्या सुनावणीला गती दिली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाचे प्रमुख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शनिवारी ते नोटीस पाठविणार असून सोमवारी दोन्ही पक्षप्रमुखांची बाजू ऐकून घेण्याची शक्यता आहे.

आमदार अपात्रतेच्या प्रकरणात निर्णय देण्यास होत असलेल्या दिरंगाईबद्दल सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांच्या कामाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली होती. तसेच त्यांना एक आठवड्यात सुनावणी घेऊन या प्रकरणाचा निकाल लवकर देण्याचे आदेश दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर राहुल नार्वेकर यांनी दोन्ही गटांच्या प्रमुखांना नोटीस पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. ते आपल्या कार्यालयामार्फत शनिवारी नोटिसा बजावणार आहेत.

दोन्ही पक्षप्रमुखांना आमदार अपात्रतेबाबत आपापली बाजू मांडावी लागणार आहे. नार्वेकर यांनी कायदेतज्ज्ञ आणि विधिमंडळ सचिवांशी चर्चा करून हा निर्णय घेतला आहे. आता शिंदे, ठाकरे प्रत्यक्ष हजर राहतात की त्यांचे वकील बाजू मांडतात हे स्पष्ट होणार आहे.

आमदार अपात्रताप्रकरणी कोणावरही अन्याय केला जाणार नाही. सर्वांना बाजू मांडण्याची संधी दिली जाईल व सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा आदर केला जाईल, असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

Back to top button