पुणे; पुढारी वृत्तसेवा : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) रिंग रोड प्रकल्पाच्या भूसंपादनाला सुरुवात करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात सोलू, निरगुडी आणि वडगाव शिंदे या तीन गावांच्या भूसंपादनासाठी जमीन मोजणीची प्रक्रिया सुरू करण्यात आली. या तीन गावांतून 28 हेक्टर क्षेत्र संपादित केली जाणार आहे. राज्य रस्ता विकास महामंडळाच्या रिंग रोडच्या प्रकल्पामुळे पीएमआरडीच्या अंतर्गत रिंग रोडची रुंदी 110 मीटरवरून 65 मीटर करण्यात आली आहे.
यासाठी सुमारे 750 हेक्टर भूसंपादन करावे लागणार आहे. मात्र, संपूर्ण प्रकल्पासाठी नगररचना योजनेतून (टीपी स्कीम) तसेच अन्य प्रकल्पांमधूनही जमीन उपलब्ध होणार आहे. पहिल्या टप्प्यात तीन गावांमधील भूसंपादन करण्यात येणार आहे. त्यात सोलू गावातील 13.17 हेक्टर, निरगुडीतील 9.32 हेक्टर आणि वडगाव शिंदे येथील 5.71 हेक्टरचे भूसंपादन करण्यात येणार आहे. हा टप्पा पूर्ण झाल्यावर तो एमएसआरडीसीच्या परंदवडी ते सोलू या रिंग रोडच्या टप्प्याला जोडण्यात येणार आहे.
त्यामुळे नगर रस्त्यावरील वाहतूक थेट आळंदी किंवा सोलू येथून एक्स्प्रेस वेवरून मुंबईकडे वळविता येणार आहे. पीएमआरडीएचा हा अंतर्गत रिंग रोड 83 किलोमीटरचा असून, त्यासाठी खेड, हवेली, मुळशी आणि मावळ तालुक्यांतील 45 गावांमधील 720 हेक्टर भूसंपादन करावे लागणार आहे. पहिल्या टप्प्यासाठी 4.8 किलोमीटरचा सोलू ते वडगाव शिंदे या रस्त्याचे काम पूर्ण केले जाणार आहे.
पीएमआरडीएच्या अंतर्गत रिंग रोडसाठी पहिल्या टप्प्याच्या तीन गावांसाठी भूसंपादनाचा प्रस्ताव प्राप्त झाला आहे. त्यासाठी जमीन मोजणीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
प्रवीण साळुंखे, उपजिल्हाधिकारी,
भूसंपादन समन्वय अधिकारी,
जिल्हा प्रशासन.
हेही वाचा