नाशिक : आंबोलीत जि. प. शाळेच्या विद्यार्थिनीचा प्रकृती खालावल्याने मृत्यू | पुढारी

नाशिक : आंबोलीत जि. प. शाळेच्या विद्यार्थिनीचा प्रकृती खालावल्याने मृत्यू

ञ्यंबकेश्वर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

ञ्यंबकेश्वर तालुक्यातील आंबोली येथील जिल्हा परिषद शाळेत पहिलीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या पूर्वा विलास गवते या सात वर्षे विद्यार्थिनीचा उलट्यांचा त्रास होऊन अचानक प्रकृती खालावल्याने मृत्यू झाला. तिला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात नेण्यास विलंब झाल्याने आपले प्राण गमवावे लागल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

संबधित बातम्या :

पूर्वा बुधवारी (दि. 20) दुपारी शाळेत १ च्या सुमारास जेवण करत असताना तिला अचानक उलटयांचा त्रास सुरू झाला. तेथे बाजूलाच असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात तिला उपचारासाठी दाखल केले, मात्र तोपर्यंत पूर्वाची तब्येत खालावली होती. तिला तातडीने नाशिकला नेण्याचा निर्णय शिक्षकांनी घेतला, परंतु रुग्णवाहिकेचा चालक नसल्याने जवळपास अर्धा तास वेळ वाया गेला. तोपर्यंत पूर्वाची शुध्द हरपली होती. तिला खासगी वाहनाने ञ्यंबकेश्वर उपजिल्हा रुग्णालयात व तेथून नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात दुपारी ४.१५ ला दाखल करण्यात आले. नाशिक जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी तिला तपासले असता तिचे निधन झाल्याचे जाहीर केले. त्र्यंबक पोलिस ठाण्यात या प्रकरणी नोंद करण्यात आली आहे.

पूर्वाचे आईवडील मजुरी करतात. तिला एक धाकटा भाऊ आहे. मोलमजुरी करणाऱ्या गरीब कुटुंबावर केवळ प्रशासकीय हलगर्जीपणाने चिमुकलीला गमावण्याची वेळ आली आहे. आदिवासी विकास परिषद आणि अन्य संघटनांच्या कार्यकर्त्यांनी याबाबत त्र्यंबकेश्वरचे गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन देत चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्र्यंबक पंचायत समिती कार्यालयात भाजपचे तालुकाध्यक्ष विष्णू दोबाडे, बिरसा मुकणे, उत्तम लिलके, जयवंत हागोटे, बुधा ढोरे, मुरली दिवे यांनी कारवाईचे निवेदन दिले आहे.

हेही वाचा :

Back to top button