Mumbai Ganeshotsav : मुंबईतील गणेशोत्सव मंडळांची माहिती एका क्लिकवर | पुढारी

Mumbai Ganeshotsav : मुंबईतील गणेशोत्सव मंडळांची माहिती एका क्लिकवर

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : मुंबईतील प्रसिद्ध १५० गणपतींचे दर्शन आणि गणपती मंडळाची सविस्तर माहिती हॅशटॅग बाप्पा या संकेतस्थळावर निशुल्क उपलब्ध करुन देण्यात आली आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या हस्ते या संकेतस्थळाचे उद्घाटन करण्यात आले. या संदर्भात माहिती देताना निकेद्वारी लेन गणेश- ओत्सव मंडळाचे सचिव प्रकाश कनावजे म्हणाले, की या संकेतस्थळासाठी १५० पेक्षा जास्त गणेश मंडळांनी आपला सहभाग नोंदवला आहे. हे संकेतस्थळ भाविकांसाठी निःशुल्क उपलब्ध आहे. यावर भाविकांना मुंबईतील गणपतींचे दर्शन घेता येणार आहे.

यावेळी संभाजी महाराजांच्या हस्ते गिरगावचा राजा क्यु आर कोडचे अनावरण करण्यात आले. त्यानंतर बोलताना छत्रपती संभाजी महाराज म्हणाले, की मुंबईमधील सर्व गणपतीचे दर्शन व मंडळाची सविस्तर माहिती एका क्लिकवर मिळणार म्हणजे आपला उत्सव आणखी प्रभावीपणे सर्वसामान्यांपर्यंत सहजरित्या पोहोचेल. यावेळी भरत शिंदे, छत्रपती शासन चॅरिटेबल ट्रस्टचे रमेश शहा, विनायक मेदगे, संतोष पवार, शीतल करदेकर, मंडळाचे सचिव गणेश लिंगायत, सचिव गोट्या कनावजे आदी उपस्थित होते.

निकेद्वारी मंडळाचे चित्र प्रदर्शन

शिवराज्याभिषेक सोहळ्याला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त गिरगावातील निकेद्वारी लेन गणेशोत्सव मंडळाने शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील कठीण व महत्त्वाचे क्षण आणि इतिहास चित्रांमधून जागृत केला आहे. सुनित पाटील यांनी ही चित्रे काढली असून गणपतीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची चित्रे बघण्यासाठी गर्दी उसळत असल्याचे दिसून येत आहे.

Back to top button