मुंबई; पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा निवडून आणायच्या आहेत. मंत्रिमंडळ विस्तारापेक्षा लोकसभा निवडणूक महत्त्वाची आहे. त्यामुळे आता निवडणुकीच्या कामाला लागा, असे आदेश भाजप श्रेष्ठींनी आमदारांना दिले असल्याचे समजते.
लोकसभेसाठी भाजपने 'मिशन 45 प्लस'चे टार्गेट ठेवले आहे. हे टार्गेट पूर्ण करण्यासाठी आता भाजपकडून राज्यातील सर्व आमदारांना कामाला लावले जाणार आहे. गणेशोत्सव पार पडताच भाजप आमदारांना जबाबदार्या दिल्या जाणार आहेत. विशेष म्हणजे गेल्या वर्षभरापासून भाजप आणि शिंदे गटाच्या आमदारांना मंत्रिपदाची स्वप्ने पडत आहेत. त्यामुळे त्यांचे डोळे मंत्रिमंडळ विस्ताराकडे लागले आहेत. पण आता मंत्रिपद मिळेल याची अपेक्षा न ठेवता लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागा, असे आदेश भाजप पक्षश्रेष्ठींनी आमदारांना दिले आहेत.
आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवत भाजपने 'मिशन 45 प्लस' सुरू केले आहे. महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 पैकी 45 पेक्षा जास्त जागा जिंकण्याचे भाजपचे टार्गेट आहे. या मिशनसाठी काही केंद्रीय मंत्र्यांचे दौरे राज्यातील लोकसभा मतदारसंघात पार पडले आहेत. आता भाजपचे प्रमुख नेते विधानसभेच्याही 144 मतदारसंघांत दौरे करणार आहेत.