Pune Ganeshotsav 2023 : पुण्यात आता सहाव्या दिवशीही डाॅल्बीचा ‘आव्वाज’; जिल्हा प्रशासनाकडून परवानगी | पुढारी

Pune Ganeshotsav 2023 : पुण्यात आता सहाव्या दिवशीही डाॅल्बीचा ‘आव्वाज’; जिल्हा प्रशासनाकडून परवानगी

पुणे; पुढारी वृत्तसेवा : गणेशोत्सवात यंदा पाचऐवजी सहा दिवस रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक आणि ध्वनिवर्धकांचा वापर करण्याची परवानगी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिल्याने येत्या शनिवारपासून देखावे पाहण्यासाठी पुणेकरांची, तसेच परगावाहून गणेशोत्सव पाहण्यासाठी येणार्या नागरीकांची गर्दी होणार आहे. शनिवारपासून (दि. 23) अनंत चतुर्दशीपर्यंत रात्री बारापर्यंत मंडळांचा आव्वाज सुरू राहणार असल्याने, यंदाच्या गणेशोत्सवात गर्दी वाढणार आहे.

संबंधित बातम्या :

गौरी विसर्जनानंतर देखावे पाहण्यासाठी पुणेकरांची गर्दी होते. गौरी विसर्जन शनिवारी असल्यामुळे, येत्या शनिवारी आणि रविवारी सर्व रस्ते गर्दीने फुलून जाणार आहेत. त्याचवेळी मध्यरात्रीपर्यंत मेट्रो आणि पीएमपी बससेवा सुरू राहणार असल्याने नागरीकांची मोठी सोय होणार आहे. सार्वजनिक गणेश मंडळाला ध्वनिप्रदूषणसंबंधी नियमांचे पालन करून गणेशोत्सवादरम्यान 5 ऐवजी 6 दिवस सकाळी 6 पासून ते रात्री 12 पर्यंत ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धकाचा वापर करण्यास परवानगी देण्याबाबतचा आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी गुरुवारी दिला. त्यानुसार 23 ते 28 सप्टेंबर या कालावधीत रात्री बारापर्यंत ध्वनिक्षेपक सुरू राहणार आहेत.

केंद्र शासनाच्या ध्वनिप्रदूषण (नियमन व नियंत्रण) सुधारित नियम 2017 अन्वये सण उत्सव कालावधीसाठी 15 दिवसांसाठी ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धकाच्या वापरासाठी ही सूट देण्यात आली आहे. त्यानुसार 16 फेब—ुवारी 2023च्या जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार 2023 च्या सण उत्सवांकरिता 13 दिवस निश्चित करून 2 दिवस राखीव ठेवण्यात आले होते. त्यामध्ये गणेशोत्सवाकरिता 5 दिवस निश्चित करण्यात आले होते.

तथापि, विविध लोकप्रतिनिधी व गणपती मंडळे यांनी पुणे शहरात आणि जिल्ह्यात सार्वजनिक गणपती उत्सवामधील सातव्या दिवशी गणपती विसर्जन केले जात असल्याने सदर दिवसही विशेष बाब म्हणून वाढवून मिळण्याबाबत विनंती केली होती. त्याबाबत पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षकांनीही परवानगी देण्यात कोणतीही हरकत नसल्याचे कळविले आहे. त्यानुसार राखीव 2 दिवसांपैकी 1 दिवस गणेशोत्सवासाठी (गणेशोत्सवातील सातवा दिवस) सूट देण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी जारी केले आहेत.

हेही वाचा

पुणे : ऑक्टोबरच्या 13 लाख टन कोट्यामुळे साखर नरमली

नाशिक : चुकून आलेले पावणेदोन लाख रुपये केले परत, शेतकरी महिलेची इमानदारी

पुणे : 29 ‘आरोग्यवर्धिनी’ केंद्रे जाहीर; प्रत्यक्षात मात्र चारच सुरू

Back to top button