नाशिक : आज सोनपावलांनी गौराईंचे आगमन | पुढारी

नाशिक : आज सोनपावलांनी गौराईंचे आगमन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

लाडक्या गणरायाची स्थापना झाल्यानंतर आता सोनपावलांनी माहेरवाशीण गौराईंचे आज आगमन होणार आहे. गेल्या आठ दिवसांपासून श्रीगणेश चतुर्थी व गाैराईंच्या स्वागताची घराघरांत तयारी सुरू होती. ज्येष्ठा-कनिष्ठा, महालक्ष्मी-गौरी, सखी-पार्वती अशा जोडीने त्यांना घरात आणण्याची पद्धत आहे. लाकडी, पितळी सांगाडे त्यांना आकर्षक रंगाच्या साड्या नेसवून साजश्रृंगार केला जातो. यावेळी बाईपण भारी देवा या मराठी सिनेमाची क्रेझ असल्याने त्याप्रमाणे गाैराईंना सजविण्यात आले आहे. फराळाचे विविध पदार्थ बनवत रात्री उशिरापर्यंत महिलांची लगबग सुरू होती.

संबधित बातम्या :

प्रथेनुसार गौराईंना घरात आणताना, जिच्या हातात गौरी असतात त्या महिलेचे पाय दुधाने व पाण्याने धुऊन त्यावर कुंकवाचे स्वस्तिक काढले जाते. घराच्या दरवाजापासून ते गौरी बसवायच्या जागेपर्यंत लक्ष्मीच्या पायांचे ठसे उमटवत गौरीचे मुखवटे आणले जातात. गौरीच्या पूजनानंतर पारंपरिक पद्धतीने नैवेद्य दाखविण्यात येतो. दुसऱ्या दिवशी सकाळी गौरी, महालक्ष्मी पूजा-आरती करून केलेल्या फराळाचा नैवेद्य दाखविला जातो, तर महानैवेद्यासाठी पुरणपोळी, ज्वारीच्या पिठाची आंबिल, अंबाडीची भाजी, सोळा भाज्यांची एकत्र भाजी, दिवेफळ पदार्थांचा नैवेद्य केला जातो. आज आगमन, दुसऱ्या दिवशी पूजा हळदी कुंकवाचा कार्यक्रम, तिसऱ्या दिवशी विसर्जन केले जाते.

आवाहन : दुपारी ३. ३५ (१५. ३५)पर्यंत अनुराधा नक्षत्र आहे. अनुराधा नक्षत्रावर आवाहन करावे.

गौरीपूजन : शुक्रवारी दुपारी ३. ३५ (१५. ३५)पर्यंत ज्येष्ठा नक्षत्र आहे. त्या नक्षत्रावर पूजन करावे. कोणाकडे सायंकाळी पूजा असते. त्याप्रमाणे पूजन करावे.

गौरी विसर्जन : शनिवारी दुपारी २. ५६ (१४. ५६)पर्यंत मूळ नक्षत्र आहे. या काळात मुखवटा हलवावा. नंतर आपल्या वेळेनुसार विसर्जन करावे.

– पं. अमेय काथे (नाशिक)

हेही वाचा :

Back to top button