रँकिंगचा सरताज, मोहम्मद सिराज; आयसीसी वन डे क्रमवारीत पटकावले अव्वल स्थान | पुढारी

रँकिंगचा सरताज, मोहम्मद सिराज; आयसीसी वन डे क्रमवारीत पटकावले अव्वल स्थान

दुबई ः वृत्तसंस्था : आशिया कप क्रिकेट स्पर्धेत भारताला विजेतेपद पटकावून देण्यात मोलाची कामगिरी बजावलेला वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने आयसीसी वन डे क्रमवारीत पुन्हा पहिले स्थान पटकावले आहे. श्रीलंकेविरुद्धच्या आशिया कप फायनलमध्ये घातक गोलंदाजी करून संपूर्ण संघाला 50 धावांत गुंडाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार्‍या सिराजला या कामगिरीचा चांगलाच फायदा झाला. आयसीसीच्या ताज्या वन डे गोलंदाजांच्या क्रमवारीत तो पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. कुलदीप यादवचाही टॉप 10 गोलंदाजांमध्ये समावेश आहे. मात्र, क्रमवारीत त्याचे नुकसान झाले आहे.

मोहम्मद सिराज आयसीसीच्या ताज्या एकदिवसीय क्रमवारीत अव्वल क्रमांकाचा गोलंदाज ठरला आहे. शेवटच्या क्रमवारीत त्याचे रेटिंग 643 होते आणि तो नवव्या क्रमांकावर होता. आता त्याचे रेटिंग 694 वर पोहोचले असून जोश हेजलवूडला मागे टाकत तो नंबर वन गोलंदाज बनला. त्याने थेट आठ स्थानांची झेप घेतली आहे.

हेजलवूड दुसर्‍या स्थानावर

याआधी पहिल्या क्रमांकावर असलेला जोश हेजलवूड आता दुसर्‍या स्थानावर पोहोचला आहे. त्याचे रेटिंग आता 678 आहे. न्यूझीलंडच्या ट्रेंट बोल्टलाही एक स्थान गमवावे लागले आहे. तो 677 रेटिंगसह तिसर्‍या क्रमांकावर गेला आहे. मुजीब उर रहमान याआधीही चौथ्या क्रमांकावर होता आणि अजूनही चौथ्या क्रमांकावर आहे. रशीद खान 655 रेटिंगसह पाचव्या क्रमांकावर आहे. मिचेल स्टार्कला याचा सर्वाधिक तीन स्थानांचा फटका बसला आहे. तो थेट सहाव्या क्रमांकावर घसरला आहे. न्यूझीलंडच्या मॅट हेन्री 645 रेटिंगसह सातव्या क्रमांकावर आला आहे. त्याचवेळी अ‍ॅडम झॅम्पा आठव्या क्रमांकावर आला आहे.

संबंधित बातम्या

कुलदीपची तीन क्रमांकांनी घसरण

कुलदीप यादवने आशिया कपमध्ये चांगली गोलंदाजी करून ‘प्लेअर ऑफ द सीरिज’चा पुरस्कार पटकावला असला तरी त्याला तीन स्थानांचे नुकसान सोसावे लागले आहे. आधीच्या रँकिंगमध्ये तो 656 रेटिंगसह सातव्या क्रमांकावर होता, पण आता रेटिंग 638 वर आली असून तो नवव्या क्रमांकावर गेला आहे. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी दहाव्या क्रमांकावर आहे. त्याचे रेटिंग 632 आहे.

Back to top button