पुणे; पुढारी वृत्तसेवा : पूजेचे साहित्य, फराळ, मिठाई आणि इतर साहित्यांची जुळवाजुळव करताना युवती आणि गौरी आगमनाच्या सजावटीत व्यग्र असलेल्या महिला…असे चित्र घराघरांमध्ये पाहायला मिळत आहे. गुरुवारी (दि.21) गौरींचे घरोघरी आगमन होत आहे. गौरींच्या आगमनाच्या निमित्ताने महिलांनी केलेली तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. यानिमित्ताने महिलांनी गौरी आगमानाच्या निमित्ताने खास सजावटही केली आहे.
संबंधित बातम्या :
घरांमध्ये गौरी विराजमान होणार असून, प्रथेप्रमाणे आणि परंपरेप्रमाणे गौरींचे पूजन केले जाणार आहे. गुरुवारी (दि.21) सूर्योदयापासून दुपारी 3 वाजून 35 मिनिटांपर्यंत अनुराधा नक्षत्रावर आपल्या परंपरेप्रमाणे गौरी आवाहन करावे, असे पंचागकर्ते मोहन दाते यांनी सांगितले. तर शुक्रवारी (दि.22) गौरी पूजन करावे आणि शनिवारी (दि.23) सूर्योदयापासून दुपारी 2 वाजून 56 मिनिटांपर्यंत मूळ नक्षत्रावर गौरी विसर्जन करावे, असेही त्यांनी नमूद केले. गौरींच्या आगमनाच्या निमित्ताने महिलांची तयारीही झाली असून, घरोघरी खास फुलांची, विद्युत रोषणाईची सजावट करण्यात आली आहे. गौरींच्या आगमनाच्या निमित्ताने घरोघरी हळदी-कुंकवाचे कार्यक्रमही होणार आहेत. त्यासाठीचे वाणही महिलांनी खरेदी केले.
गौरीपूजनासाठी लागणारे पूजेचे साहित्य, सजावटीचे साहित्य आणि नैवेद्यासाठीच्या खाद्यपदार्थांच्या खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये बुधवारी (दि. 20) लगबग दिसून आली. गौरींचे मुखवटे, दागिने, गौरींसाठीच्या साड्या, बांगड्यांसह विविध प्रकारचा फराळ, मिठाईची खरेदी महिलांनी केली. मंडई, लक्ष्मी रस्ता, तुळशीबाग आणि रविवार पेठ आदी ठिकाणी खरेदीसाठीचा उत्साह पाहायला मिळाला. सजावटीच्या साहित्यांसह पूजेचे साहित्यही महिलांनी खरेदी केले. मुखवटे आणि दागिन्यांच्या खरेदीसाठी तुळशीबागेत, भाज्यांसाठीच्या खरेदीसाठी मंडईत लगबग दिसून आली. तर लक्ष्मी रस्त्यांवरील दालनात साड्या खरेदीचे निमित्त महिलांनी साधले.
हेही वाचा