Heart Health : बदलत्या जीवनशैलीमध्ये प्रत्येकालाच ताणतणावांना सामोरे जावे लागते. बदलते कामाचे स्वरूप व वाढते तास, वाढती स्पर्धा, सोशल मीडियाचा वाढलेला वापर, या सार्यांमुळे तणावासारख्या समस्येला सामोरे जावे लागते. हृदयासंबंधित कोणत्याही समस्यांचे व्यवस्थापन करण्यासाठी आणि जीवनाचा दर्जा सुधारण्यासाठी तणावाचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. तणावामुळे केवळ सांधेदुखी, वंध्यत्व, रक्तातील साखरेच्या पातळीतील चढउतार एवढेच नाही, तर हृदयाच्या समस्याही निर्माण होतात. तणाव हृदयाच्या आरोग्यावर दुष्परिणाम निर्माण करतो. हृदयावर परिणाम करणार्या तणावाच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका.
संबंधित बातम्या :
तणावामुळे उच्च रक्तदाबाची समस्या उद्भवते, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघाताचा धोका निर्माण होऊ शकतो.
वाढत्या तणावामुळे हृदयावर परिणाम होतो आणि त्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये जळजळ होते. एथेरोस्क्लेरोसिस/धमन्या कडक होण्याची गुंतागुंत निर्माण होते. स्ट्रेस कार्डिओमायोपॅथी( स्नायूसंबंधित समस्या)सारख्या प्रकारात अचानक छातीत दुखणे, श्वास लागणे, छातीत धडधडणे, घाम येणे, हृदयाचे ठोके जलद होणे आणि चक्कर येणे या लक्षणांचा समावेश आहे. मळमळ आणि उलट्या हीदेखील तणावाचीच लक्षणे आहेत, ज्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.
तणावामुळे एखादी व्यक्ती जास्त प्रमाणात खाऊ शकते, त्यामुळे वजन वाढू शकते. लठ्ठपणामुळे रक्तदाब आणि मधुमेह वाढू शकतो. उच्च कॉर्टिसॉल जो एक तणाव संप्रेरक आहे, हेदेखील रक्तातील साखर आणि शरीराचे वजन वाढण्यास कारणीभूत ठरते. या सर्व घटकांमुळे हृदयविकाराचा झटका, पक्षाघात किंवा हार्ट फेल्युअरसारख्या समस्या उद्भवतात.
पचनासंबंधी समस्या, रक्तदाब वाढणे, जळजळ, हृदयातील रक्तप्रवाह कमी होणे ही काही लक्षणे आहेत, जी अधिक तणावामुळे दिसतात.
समुपदेशन, योगाभ्यास आणि मेडिटेशन तंत्राचा पर्याय निवडून तणावमुक्त राहणे गरजेचे आहे. तणावाचे व्यवस्थापन करण्याव्यतिरिक्त सर्व आवश्यक पोषक तत्त्वांचा समावेश असलेल्या संतुलित आहाराचे सेवन करणे, दररोज व्यायाम करणे आणि हृदय निरोगी राहण्यासाठी रक्तदाब आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करणे गरजेचे आहे. हृदयाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये आणि वेळोवेळी तपासणी करावी. तणाव व्यवस्थापनात व्यायामाला फार महत्त्व आहे. व्यायाम फक्त शारीरिक तंदुरुस्तीसाठीच नाही, तर मानसिक आरोग्यासाठी खूप महत्त्वाचा असतो म्हणून दैनंदिन जीवनात व्यायामाचा समावेश करावा.
हे ही वाचा :